Vijay Wadettiwar Criticized Baba Siddiqui : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या घडामोडीनंतर काँग्रेस नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक शब्दांत बाबा सिद्दीकी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गावर गोमूत्र शिंपडताना हालचाल न करता शांतपणे उभे रहा, असे वडेट्टीवार सिद्दीकींना उद्देशून म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, काही नेते चौकशीच्या फेऱ्यात आहेत तर काही जणांना ईडीचे समन्स आले आहेत. त्यामुळे ते मिळेल त्या पक्षात जात आहेत. आता मागील काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार याची चर्चा होतीच. अजित पवारांच्या गटात गेल्यानंतर त्यांना काहीतरी घबाड मिळणार असेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. सिद्दीकी आता धर्मांध पक्षात जात आहेत. ज्यांच्या मागे एजन्सी लागली ते विचारधारा सोडून जात आहेत. पण ते गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही.
बाबा सिद्दीकी पक्ष सोडून गेले म्हणून काँग्रेसचे काहीच नुकसान होणार नाही. ते आता अजित पवार यांच्याबरोबर जाणार आहेत. मात्र आगामी काळात ते भाजपाच्या इशाऱ्यावरच काम करतील ही गोष्ट राज्यातील जनतेला माहिती आहे. अजित पवार सध्या भाजपाचाच अजेंडा राबवत आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, आपल्या राजीनाम्याबाबत माहिती देताना सिद्दीकी म्हणाले, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते. पण ते म्हणतात ना त्याप्रमाणे काही गोष्टी न बोललेले चांगले असते. मला या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यात तथ्य असू शकतं