मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हेही पक्ष सोडणार आहेत का? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

आपल्या राजीनाम्याबाबत माहिती देताना सिद्दीकी म्हणाले, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते. पण ते म्हणतात ना त्याप्रमाणे काही गोष्टी न बोललेले चांगले असते. मला या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले. (Senior leader Baba Siddiqui resigns from the primary membership of the Indian National Congress Party)

राज्यातील काँग्रेस नेत्यांपैकी बाबा सिद्दीकी हे काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांमधील एक नेते आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरु असल्याचं ऐकायला मिळत होते. नुकतेच काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसचा हात सोडला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समुदाय आहे. सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात माननारा वर्गदेखील आहे. त्यामुळे आता सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवार गटाची मुंबईत ताकद वाढणार आहे.

बाबा सिद्दीकी यांच्याविषयी…

झियाउद्दीन बाबा सिद्दीकी असं त्यांचं पूर्ण नाव असून ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा, राज्याचे कामगार मंत्री म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. 1992 आणि 1997 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube