जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यात तथ्य असू शकतं…’
Vijay Wadettiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांबाबत (shriram) केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलं. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असे विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहे. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं.
Aaditi Tatkare : ‘चांगलं झालं तर आम्ही अन् चुकलं तर दादांकडूनच हे चुकीचं’
आज माध्यमांशी बोलतांना वडेट्टीवार यांना आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले. त्यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, राम बहुजन समाजाचे होते, असं आव्हाड म्हणाले. त्यात तथ्य असू शकते. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होते. महात्मा गांधी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी रामाच्या नितीनुसार देश चालवण्याचा प्रयत्न केला. आज लोक श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते रामाच्या नितीमुल्यांवर चालत नाही. त्यांच्याकडून रामाचे नाव केवळ राजकारणासाठी घेतले जात आहे. जनहित साधण्यासाठी त्यांनी कधीच रामाचा वापर केला नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय – मंत्री विखे पाटील
वडेट्टीवार पुढे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याप्रमाणे राम बहुजन समाजाचे होते. त्यांच्या या वाक्याचे पुरावे वाल्मिकी रामायणात सापडतात. तुलसीदासांच्या रामायणात याचा पुरावा मिळणार नाही. आत्तापर्यंत हजारांहून अधिक रामायणे लिहिली गेली आहेत. वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर आपल्याला कळेल की जितेंद्र आव्हाड खरं बोलत आहेत. प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय होते. ते सेनानी-लढाऊ होते. त्यामुळेच त्यांनी अन्यायाविरुद्ध धनुष्यबाण घेऊन लढा दिला. त्यांच्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णही ओबीसी समाजाचे होते, असं वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी राम हे बहुजन-ओबीसी समाजाचे असल्याचे सांगितलं. मात्र, राम मांसाहारी होता, या आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यापासून अंतर राखलं. त्यावेळी कोण काय खात होतं? तर ही तेव्हाची गोष्ट आहे. आज यावर बोलू शकत नाही. पण, वाल्मिकी रामायणानुसार, श्रीराम नक्कीच बहुजन होते, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
राम आपला आहे. तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. पण आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात केला होता.