Ajit Pawar on Sangram Jagtap : ‘कोणताही पक्ष चालवत असताना जातीचा आणि नात्यगोत्यांचा विचार करुन चालत नाही. सगळा समाज डोळ्यांसमोर ठेऊन आपल्याला काम करावे लागते. सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे. उद्याही हीच भूमिका राहणार आहे. यात एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.’, अशा शब्दांत अजित पवार यांनी पक्षाची भूमिका सांगितली. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या भेटीत नेमकं काय घडलं याची माहिती देताना अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘मधल्या काळात माझ्या एका सहकाऱ्याने असंच एक वक्तव्य केलं होतं. मागच्या मंगळवारीच मी त्यांना भेटणार होतो. परंतु, दिंडीमुळे भेटता आलं नाही. त्यानंतर आज सकाळीच मी त्यांची (संग्राम जगताप) भेट घेतली. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांना व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाही. तुमचं काही असेल तर मला सांगत चला मी त्या ठिकाणी लक्ष देईल. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. या गोष्टी फक्त भाषणात नाही तर कृतीतही दिसल्या पाहिजेत. नाहीतर विनाकारण गैरसमज निर्माण होतात. विरोधकांकडूनही त्याचा फायदा घेतला जातो. सोशल मीडियात या गोष्टी दाखवून पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.’
‘चुकीची भूमिका घेऊ नये’, आमदार संग्राम जगताप आणि अजित पवारांची भेट; नेमकं काय घडलं?
आषाढी वारी सुरू असल्याने दिंडी आणि वारकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने आमदार जगताप अन् अजित पवार यांची भेट झाली नव्हती. दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे सुरू झाले. आमदार जगताप देखील अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंगळवारी अजित पवार यांची भेट घेतली. लेट्सअप मराठीशी संवाद साधताना आमदार जगताप म्हणाले दिंड्यांच्या कारणास्तव माझी अन् अजित पवारांची भेट झाली नाही, याबाबत त्यांना निरोप दिलेला होता. आमचं मत अन् आमची भूमिका याबाबत अजित पवारांशी चर्चा झालेली आहे. याबाबत सविस्तर गोष्टी अजितदादा बोलतील, असं देखील यावेळी बोलताना जगताप म्हणाले होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. हिंदू समाजाची बाजू आ. जगताप अत्यंत प्रखरेतेने मांडत आहेत. त्यांची सध्याची भूमिका आणि वक्तव्यांमुळे त्यांच्या स्वपक्षातील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार आणि संग्राम जगताप यांच्या भेटीला महत्व आले होते. आता या भेटीत काय झालं याची माहिती अजित पवार यांनीच दिली आहे. यानंतर आता आमदार संग्राम जगताप याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजितदादांच्या चर्चेला आमदार संग्राम जगताप यांची दांडी..अहिल्यानगरचे राजकारण तापणार