Devendra Fadnavis : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist attack in Pahalgam) केंद्र सरकारने (Central Govt) गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. मात्र, या बैठकीला ठाकरे गटाच्या खासदारांनी दांडी मारली होती. तसेच ठाकरे गटाने या हल्ल्यावरून सरकारवर टीका केली होती. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे आता…, CM फडणवीसांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
मुख्यमंत्री फडणवीसांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ठाकरे गटाविषयी बोलतांना ते म्हणाले की, शत्रू आपल्यावर हल्ला करतो तेव्हा राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे सोडून देश म्हणून एकत्र आलं पाहिजे. बांगलादेश युद्धादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. अशी अनेक उदाहरणे आहेत. ही या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली.
दुश्मन ज्यावेळी आपल्या देशावर हल्ला करत आहे, त्यावेळी भारत देशातील सर्वच पक्षांनी कधी राजकारण केलं नाही, त्यावेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. राजकारण केलं नाही, हीच या देशाची परंपरा आणि इतिहास आहे. मात्र, ठाकरे गट देशाचा इतिहास आणि परंपरला विसल्याचं मला दुःख आहे, असे फडणवीस म्हणाले.
भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल. पाकिस्तानी नागरिकांनी पुढील ४८ तासांच्या आत देश सोडावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानेच चपराक लावलेली आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. राहुल गांधी कायम स्वातंत्र्य सैनिकांचे अपमान करतात. तसेच ज्या भाषेत ते टीका करतात, त्यामुळं संपूर्ण देशवासीयांचे मन दुखावले गेले. आता आता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का?, असा सवाल फडणवीसांनी केला.