मुंबई : आज खेडमध्ये झालेली सभा म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थयथयाट होता फक्त जागा बदलली होती. नवीन काही मुद्दे नव्हते. आरोप प्रत्यारोप करण्याची चढाओढ होती. बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कोणाची खाजगी संपत्ती नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे.
ते पुढं म्हणाले, आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जात आहोत. बाळासाहेबांच कर्तृत्व मोठं होतं. वडील वडील करुन त्यांना कोणी छोटं करु नये. खरे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. म्हणून त्यांना माहिती होतं लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. मागच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोकणच्या जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे. त्यांना धास्ती होती लोक कसे गोळा होतील. यासाठी त्यांनी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथून गाड्याभरून लोक घेऊन गेले होते, अशी टीका खेडच्या सभेवर एकनाथ शिंदे यांनी केली.
अनिल देशमुख, नवाब मलिकाना ते स्वातंत्र्यसैनिक म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला
गेल्या सहा सात महिन्यांत मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. ती कामे देखील सुरु झाली आहेत. त्याची पोचपावती लोकांनी आज दिली. शिवसेना-भाजपच्या कामाची ही पोचपावती आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर जनतेच्या आणि ईश्वराच्या आर्शिवादाने हे सर्व घडले आहे. जनतेचे आर्शिवाद घेण्यासाठी आजची शिव आर्शिवाद यात्रा होती. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.