मुंबई : नुसत्या नावानाचे भल्या भल्या राजकारण्यांना आणि उद्योगपतींना धडकी भरविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला (ED) मुंबईत आता हक्काचे ऑफिस मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईडीला बीकेसीमध्ये 362 कोटी रुपयांचा अर्धा एकर भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. 80 वर्षांच्या लीजवर हा भूखंड ईडीला दिला जाणार आहे. या जागेवर 10,500 स्क्वेअर मीटरपर्यंत इमारत बांधता येणार आहे. (Enforcement Directorate (ED) has been allotted a Rs 362 crore plot in Bandra-Kurla Complex (BKC) for its office)
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात ईडीला आतापर्यंत स्वतःचे हक्काचे ऑफिस नव्हते. सध्याचे ऑफिस आणि आणि स्टोअर रूम हे तिन्ही वेगवेगळ्या आणि भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. यापैकी दोन ऑफिस बॅलार्ड इस्टेटमध्ये तर एक स्टोअर रुम वरळीमध्ये आहे. ही स्टोअर रुम तर मयत ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आहे.
या तिन्ही इमारतींमध्ये इतर खासगी कंपन्यांचीही ऑफिसेस आहेत. त्यामुळे ईडीला तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणे अवघड जाते. शिवाय दोन्ही ठिकाणी येण्या-जाण्याच्या प्रवासातही वेळ वाया जात आहे.या अडचणी लक्षात घेऊन, ईडीने एप्रिल 2022 मध्ये स्वतःच्या ऑफिससाठी जागा मिळावी असे पत्र एमएमआरडीएला पाठविले होते.
30 मे 2023 रोजी एमएमआरडीएने ही विनंती मंजूर करत ईडीला बीकेसीमध्ये अर्ध्या एकराचा एक भूखंड उपलब्ध करुन दिला. 3.4 लाख रुपये प्रति चौरस मीटर या दराने ही जागा उपलब्ध करुन दिली गेली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 30% आगाऊ पैसे जमा करण्याची अट टाकली होती. मात्र आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “बीकेसी परिसरात बाजारभावापेक्षा कमी दराने मालमत्ता देण्याची तरतूद नाही. त्यामुळे बीकेसीमध्ये ज्या दराने मालमत्ता विकल्या गेल्या त्याप्रमाणेच आम्ही पैसे आकारले आहेत.