Download App

आणखी एक काँग्रेसीला CM शिंदे आयात करणार? संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. प्रवेशानंतर निरुपम यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गतवेळी याच मतदारसंघात कीर्तीकर यांनी निरुपम यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला होता. (Former Congress MP Sanjay Nirupam will join the Shiv Sena in the presence of Chief Minister Eknath Shinde.)

संजय निरुपम हे मूळचे शिवसैनिकच. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना हिंदी सामनाचे संपादक केले, नंतर 1996 आणि 2002 असे दोनवेळा त्यांना राज्यसभेवरही पाठवले. 2004 साली देखील निरुपम यांनी याच मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसच्या सुनील दत्त यांनी 47 हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे 2006 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009 मध्ये मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपच्या राम नाईक यांचा पराभव करुन ते विजयी झाले होते.

Lok Sabha Election : नाशिक महायुतीत घमासान! गोडसेंचं शक्तीप्रदर्शन; भाजप इच्छुकांची मुंबईत धडक

ठाकरेंच्या खेळीने कीर्तीकरांची कोंडी :

या मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढता आली असती. पण उद्धव ठाकरे यांनी कीर्तिकरांचा गेम करत त्यांच्याच मुलाला निवडणूक रिंगणात उतरवले.  गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आहेत. उद्धव ठाकरे यांनी अमोल यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे गजानन कीर्तीकरांची कोंडी झाली आहे. मुलाच्या उमेदवारीनंतर कीर्तिकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भुमिकेमुळे शिंदे यांनी निरुपम यांना आयात करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

अमरावतीचा तिढा वाढला, राणांच्या उमेदवारीला कडूंचा विरोध; नाराजी दूर करण्यासाठी CM शिंदेंची मध्यस्थी

संजय निरुपम हे देखील यंदा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला गेल्याने त्यांनीही शिवसेना प्रवेशाचे मार्ग अवलंबल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या जागेवरुन शिवसेनेकडून अभिनेता गोविंदाच्या नावाचीही चर्चा होती. परंतू, शिंदे यांनी निरुपम यांच्याच नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे गोविंदा यांचे नाव आता मागे पडले आहे.

follow us