Mumbai Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात मोठे यश संपादन केले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. मनसे, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळता आली नाही. मुंबईतील निवडणुकीत तर सगळीकडे भाजपचाच करिष्मा दिसून आला. मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या मात्र महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 14 तर समाजवादी पार्टीला एका ठिकाणी विजय संपादन करण्यास यश आलं आहे.
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागा जिंकत भाजपाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीला भाजपकडून आता तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला होता. त्याची सगळी कसर विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरून काढली. भाजपाने 16 जागांवरील विजयी रथ कायम ठेवला. गद्दारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढले.
Election Result 2024 : महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?
लाडकी बहीण योजना, युवा रोजगार प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाच्या जोरावर महायुतीने जोरदार कमबॅक केलं. भाजपाने 19 जागा लढविल्या होत्या त्यातील तीन जागा त्यांच्या हातातून निसटल्या. वर्सोवा मतदारसंघात भारती लवेकर यांच्यावर मतदारसंघात नाराजी, मालाड मतदारसंघात विनोद शेलार यांना बाहेरचा उमेदवार म्हणून लक्ष्य केलं गेलं. कलीना मतदारसंघात अमरजीत सिंग नवीन चेहरा असल्याने भाजपाला फटका बसल्याचे बोलले जात आहे .
विधानसभा निवडणुकीत मनसेकडून 125 ठिकाणी उमेदवार देण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाच्या माध्यमातून जनतेला मनसेला निवडून देण्याचे आवाहन करीत होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा विधानसभा निवडणुकीत चालला नाही. इतकंच काय त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले. शिंदे शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं कडवं आव्हान होतं. मात्र या लढाईत ठाकरे सेनेच्या महेश सावंत यांनी बाजी मारली.
वरळीतून संदीप देशपांडे, शिवडीतून बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हणत हल्लाबोल केला होता तसेच लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत बदलत जाणाऱ्या भूमिकेमुळे मतदारांनी त्यांना नाकारले असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार दिले होते त्यातील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आला आहे. अणुशक्ती नगरमधून शरद पवार गटाच्या फहाद अहमद यांचा सना मलिक यांनी पराभव केला आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांना ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी मात दिली आहे तर शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी नवाब मलिक यांचा दारुण पराभव केला.
विरोधकांच्या फेक अजेंड्याला थेट उत्तर, मंत्री मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल
पक्षफुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन ठाकरे सेनेने केलं होतं आता देखील विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेने दहा जागी आपली विजयी पताका फडकावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा ठाकरे सेनेने मुंबई लढवल्या होत्या. मात्र त्यातील दहा जागांवर त्यांना विजय संपादन करता आला. शिंदे शिवसेनेच्या सहा शिलेदारांना विजयश्री खेचून आणण्यात यश आलं. वरळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे शिंदे शिवसेनेचे मिलिंद देवरा तर मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत होती मात्र या ठिकाणी दुसऱ्यांदा विजय संपादन करून आदित्य ठाकरे यांनी आपला गड राखला आहे.
मुंबईतील भायखळा विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसूतकर विजयी झाले आहेत. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी रवींद्र वायकर यांचा निसटता विजय झाला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत (बाळा) नर यांनी त्यांचा पराभव केला आहे.
मुंबईत काँग्रेस पक्षाला तीनच जागा मिळाल्या आहे. मालाड विधानसभा मतदारसंघात अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार विनोद शेलार यांचा पराभव केला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्ष गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांनी विजय संपादन केला आहे तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या शायना एनसी यांचा पराभव करून अमीन पटेल यांनी पुन्हा एकदा विजय संपादन करून आपला गड राखला आहे.
भाजप
मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, पराग अळवणी, पराग शाह, कालिदास कोळंबकर, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेचा, योगेश सागर, विद्या ठाकूर, अमित साटम, राम कदम, कॅप्टन तमिल सेल्वन, आशिष शेलार.
शिंदे शिवसेना
मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे,
उद्धव ठाकरे शिवसेना
सुनील राऊत, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, संजय पोतनीस,
काँग्रेस
अस्लम शेख आणि अमीन पटेल तर सपाकडून अबू आझमी यांना पुन्हा मुंबईकरांनी पुन्हा संधी दिली आहे.
एकूण महायुती – २२
भाजप- १५
शिंदे सेना – ६
एनसीपी अजित पवार – १
उबाठा – १०
काँग्रेस – ३
समाजवादी पक्ष – १
बोरिवली – संजय उपाध्याय
दहिसर – मनीषा चौधरी
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
गोरेगाव – विद्या ठाकूर
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
अंधेरी पश्चिम – अमित साटम
मुलुंड – मिहिर कोटेचा
घाटकोपर पश्चिम – राम कदम
घाटकोपर पूर्व – पराग शहा
विलेपार्ले – पराग अळवणी
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोळीवाडा – तमिळ सेलवन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबारहिल – मंगल प्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
१) मागाठणे – प्रकाश सुर्वे
२) अंधेरी पूर्व – मुरजी पटेल
३) भांडुप पश्चिम – अशोक पाटील
४) चांदीवली – दिलीप लांडे
५) कुर्ला – मंगेश कुडाळकर
६) चेंबूर – तुकाराम काते
अनुशक्ती नगर – सना मलिक
१) भायखळा – मनोज जमसुतकर
२) वरळी – आदित्य ठाकरे
३) शिवडी – अजय चौधरी
४) माहीम – महेश सावंत
५) वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
६) विक्रोळी – सुनील राऊत
७) वर्सोवा – हारून खान
८) दिंडोशी – सुनील प्रभू
९) जोगेश्वरी पूर्व – अनंत बाळा नर
१०) कलिना – संजय पोतनीस
काँग्रेस (३)
१) मालाड पश्चिम – अस्लम शेख
२) मुंबादेवी – अमीन पटेल
३) धारावी – ज्योती गायकवाड
समाजवादी पक्ष(१)
१) मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी