Mumbai News : राज्यात यंदा दिवाळीतच विधानसभा निवडणूक (Maharashtra Elections) आली आहे. त्यामुळे दिवाळीतील फटाक्यांसोबतच राजकीय फटाके देखील फुटत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी ४ तारखेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र (Mumbai News) स्पष्ट होईल. मात्र त्याआधीच एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS Deepotsav) दिपोत्सव कार्यक्रमावेळी लावलेले कंदील हटवले आहेत. याबाबत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार (Election Commission) दाखल केली होती. त्यामुळे कारवाई होण्याआधीच मनसेने कंदील काढून टाकले आहेत.
मनसेने मुंबईतील दादर भागात दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी काही कंदील लावण्यात आले होते. या कंदिलांवर ठाकरे गटाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे तक्रार दिली होती. दिपोत्सवाच्या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहीम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी देखील ठाकरे गटाने केली होती.
यंदा मनसे सत्तेत अन् मुख्यमंत्री भाजपचा असेल; राज ठाकरेंच्या मोठ्या विधानाने राजकीय धमाका
दिवाळी सणानिमित्त मनसेने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मनसेचे चिन्ह आणि नाव असलेले भगवे कंदील ठिकठिकाणी लावण्यात आले होते. ऐन निवडणुकीत अशा पद्धतीने मनसेकडून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. यानंतर ठाकरे गटाने आयोगाकडे तक्रारही केली होती. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली. यानंतर मनसेनेही पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेले कंदील हटवले आहेत.
यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. जर या ठिकाणी हिरवे कंदील लागले असते तर असाच विरोध केला असता का असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.
माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ शिंदे मात्र..काय म्हणाले फडणवीस?