Download App

दहावी, बारावीच्या हॉल तिकीटावरील जात प्रवर्गाचा निर्णय रद्द; शिक्षण मंडळाची माघार

दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून अखेर रद्द.

Mumbai News : दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या चांगलाच अंगलट आला. या निर्णयावर चौफेर टीका झाली. त्यानंतर मंडळाने माघार घेत हा निर्णयच रद्द केला आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला होता परंतु, लोकभावनांचा आदर करत हा निर्णय मागे घेत आहोत, असे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे.

यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर होत आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांची तयारी शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. थोड्याच दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात होईल. मात्र त्याआधीच यावरून नवा वाद सुरू झाला होता. राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख केला होता.

दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी? शिक्षणमंत्र्यांनी तारीखच सांगितली

या निर्णयावर टीकेची झोड उठली. विविध घटकांतून या निर्णयावर टीका केली जाऊ लागली. तरी देखील विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं समर्थन शिक्षण मंडळाने केलं होतं. परंतु, त्यानंतर टीकेची धार आणखी वाढली. यामध्ये राजकीय नेत्यांनीही उडी घेतली. विरोधकांना आयतीच संधी मिळाली. त्यांनीही शिक्षण मंडळावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. अखेर लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता शिक्षण मंडळाने हा निर्णयच रद्द केला आहे.

दरम्यान, आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 23 जानेवारीपासून प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे 20 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षण मंडळाचं म्हणणं काय ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर (Maharashtra SSC Hall Ticket) विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. हॉल तिकिटावर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले.

राज्यातील शाळांत CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काय सांगितलं?

बारावीच्या हॅाल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर त्यांच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे, ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी अनेक कागद पत्र काढावी लागतात. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कागदपत्रे काढताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही यासाठी हॉल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखवल्यावर असतो. त्यात चूक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते. ते टाळण्यासाठी हॅाल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख मंडळाने केल्याचे गोसावी म्हणाले होते.

follow us