दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी? शिक्षणमंत्र्यांनी तारीखच सांगितली
Pune News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. या परीक्षांचे निकाल 15 मे पर्यंत जाहीर होतील अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली. शिक्षणमंत्री भुसे यांनी काल पुण्यात शिक्षणविषयक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठीही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भुसे यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर होत आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे 15 मेपर्यंत जाहीर होईल असे भुसे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांचा पट कमी होत चालला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत गुणवत्ताही ढासळली आहे. हा मुद्दा अनेक वर्षांपासून कायम आहे. यात आता सुधारणाही होत आहेत.
विद्यार्थी संख्या कमी होत असल्याच्या मुद्द्यावर भुसे म्हणाले, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांत विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी या सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करणे योग्य ठरणार नाही. शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य झाली आहे. अशा वेळी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. समूह शाळांना विरोध करून चालणार नाही. शाळा बंद करण्याऐवजी विद्यार्थी संख्या वाढविण्यावर सरकारचा भर राहणार आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
शाळांत सीबीएसई पॅटर्न राबवणार
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हा पाठ्यक्रम लागू करणार आहोत. या नव्या पॅटर्नची माहिती शिक्षकांना देण्यात येईल. त्यांना आधी प्रशिक्षित करण्यात येईल. शाळांचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याबाबतही चाचपणी करण्यात येत आहे, असे दादा भुसे यांनी सांगितले.
परीक्षेतील गैरप्रकारांना बसणार आळा
या परीक्षांतील गैरप्रकार नेहमीच वादाचा मुद्दा ठरत असतो. चोख नियोजन केल्यानंतरही गैरप्रकार घडतात. त्यामुळे शिक्षण विभागाने यंदा अधिक बारकाईने नियोजनास सुरुवात केली आहे. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत त्या केंद्रांसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांतून करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दादा भुसे अन् महेंद्र थोरवे भिडले! शिंदे गटाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा
दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र 20 पासून मिळणार
फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळांनी प्रवेशपत्र छपाई करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र www.mahahsssboard.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर शाळेच्या मुख्याध्यापकांचा शिक्का घेऊन सही करावी. या प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचा फोटो लावून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून सही करावी अशा सूचनी देण्यात आल्या आहेत.