मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गटात विभागली गेलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गट मुंबई विभाग अध्यक्ष नवाब मलिक विरुद्ध कार्याध्यक्ष राखी जाधव या दोन बड्या नेत्यांमधील वादाने आणि गटबाजीच्या राजकारणाने टोक गाठल्याचे दिसून येत आहे. यात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नवाब मलिक समर्थक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Mumbai Division President Nawab Malik vs Working President Rakhi Jadhav and Sharad Pawar Politics)
नवाब मलिक समर्थक मुंबई युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांनी कार्याध्यक्ष राखी जाधव यांना पत्र लिहून अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. यात निलेश भोसले यांनी म्हटलं की, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष यांनी मुंबई विभाग अध्यक्ष नवाब मलिक यांचा फोटो मुंबईच्या कार्यालयातून हटविला.
त्यामुळे नवाब भाई यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्या नाराज झाला आहे. भाजपविरोधात लढा देत पक्षासाठी नवाब भाई यांनी पंधरा महिन्यापेक्षा जास्ती काळ जेलामध्ये काढला आहे. पक्षासाठी केलेल्या त्यांनी त्यांच्या त्यागाची अशाप्रकारे परतफेड होत असल्याचे खेद वाटतो.
तसेच नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोपही भोसले यांनी केला.मलिक यांच्या कार्यकर्त्यांना डावलून राखी जाधव त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती मुंबई विभागात करत आहेत. मुंबई विभागावर आपले वर्चस्व दाखवण्याकरिता राखी जाधव यांच्याकडून नबाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक देत आहेत.
याशिवाय मुंबई विभागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष आणि दक्षिण व उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष या मी केलेल्या नियुक्यांनाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे.
राखी जाधव यांचा महापालिकेतला कामाचा अनुभव पाहता त्यांच्या नियुक्तीनंतर ज्याप्रमाणात संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या भूमिकांवर काम होणे गरजेचे होते, त्याप्रमाणात होताना दिसत नाही, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, रखडलेला विकास, नागरिकांच्या समस्या यांवर आंदोलन होताना दिसत नाहीत.
त्याचवेळी अशा भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र डावलण्याचे काम राखी जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे. नवाब मलिक मुंबई अध्यक्ष असताना ते ज्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेत होते त्या प्रमाणात राखी जाधव यांच्याकडून कुठलीही भूमिका घेण्यात येत नाही, असेही निलेश भोसले यांनी म्हटलं आहे.