NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेताच झाली. घटनेनुसार शरद पवार (Sharad Pawar) हे पक्षाचे सदस्यच नाहीत मग अध्यक्ष तरी कसे होऊ शकतात, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला.
या सुनावणीत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची तर अजित पवार गटातील सुनील तटकरे, अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. या सुनावणीत शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केला. त्यांच्या या युक्तिवादावर अजित पवार गटाच्या वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केले.
सरकारमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोर जावे लागते एखादा व्यक्ती मीच अध्यक्ष आहे आणि मीच निर्णय घेऊ शकतो असे म्हणू शकत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल प्रदीप संचेती यांनी केला. त्यावर शरद पवार गटाचे वकिल जगतियानी म्हणाले, अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकला. राजकीय पक्षाला बगल देता येणार नाही तसेच कोणता पक्ष हे प्रथमदर्शनी ठरवावे लागते.
यानंतर दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या (दि.2) सायंकाळपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना काय आहे,त्यात बहुमत कोणाला आहे या प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना दोन्ही गटांना दिल्या आहेत. यानंतर या प्रकरणी नार्वेकर काय निकाल देतात याची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 15 फेब्रुवारीआधीच निकाल येईल अशी शक्यता आहे.
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच; निकालावर राऊतांचा गंभीर आरोप