Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच; निकालावर राऊतांचा गंभीर आरोप
Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) निकालावर केला आहे. अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल नूकताच राहुल नार्वेकरांनी जाहीर केला आहे. या निकालामध्ये ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं असून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकालही नार्वेकरांनी यावेळी दिला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत संतापले आहेत.
संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा न्याय नाहीतर षडयंत्र आहे. निर्णय देणाऱ्यांना पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपचं हे षडयंत्र असून बाळासाहेबांची शिवसेना मातीमोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण शिवसेना उभी राहणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना इतिहासजमा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून आम्ही न्यायालयीन लढाई सुरुच ठेवणार असल्याचं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
मी सकाळीच सांगितल होतं की ही मॅच फिक्सिंग असून सर्वोच्च न्यायालाने निकाल दिला आहे, की भरत गोगावले हे बेकायदेशीर व्हिप आहेत, पण निवडणुक आयोग हा चोरांचा सरदार आहे. तुम्ही निवडणुका घ्या मग ठरवला खरी शिवसेना कोण आहेत ते. ज्यांनी गद्दारी केली खंजीर खुपसला महाराष्ट्रद्रोह्यांसोबतच जाऊन सरकार स्थापन केलं त्यांना अपात्र करणं हाच खरा मार्ग होता पण तसं झालं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
दोन्ही गटांनी दिलेली घटना मान्य नाही
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. यावर देखील तारीख नव्हती. निवडणूक आयोगाकडे 1999 सालच्या घटनेची प्रत होती. त्यामुळे 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आले नाहीत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालात म्हटलं आहे.
योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल वाचून दाखवताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अगोदर खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देत आहेत. त्यामध्ये पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या ते नार्वेकर सांगत आहेत. त्यांनी सांगितलं की, आमदार योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही गटाकडून शिवसेनेची घटना मागवली. मात्र घटना न मिळाल्याने निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे.