Download App

Ajit Pawar : अजितदादा येताच पडळकर गायब; फडणवीसांच्या घरी नक्की काय घडलं?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. पडळकर पवारांवर टीका करताना नेहमीच कठोर शब्द वापरतात. आताही त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर केलेल्या टीकेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कुठे पडळकरांचा (Gopichand Padalkar) पुतळा दहन तर कुठे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पडळकर नेहमीच अजितदादांसमोर येणे टाळतात. आताही हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी एकत्र येण्याची शक्यता होती. मात्र, तसे काही घडलेच नाही. अजितदादांनी एन्ट्री घेताच पडळकरांनी तेथून काढता पाय घेतला.

घडलं असं की , अजित पवार (Ajit Pawar) आज फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. योगायोगाने पडळकरही तिथे उपस्थित होते. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अजित पवार आल्याचे समजताच पडळकर यांनी बंगल्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार एका गेटने आत आल्यानंतर पडळकर दुसऱ्या गेटने बाहेर पडले.

Ajit Pawar : खडसे, पडळकर ते राऊत अजितदादांनी सर्वांना घेतले फैलावर

पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Goipchand Padalkar) यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने करून झाल्यानंतर आता त्यांनी पुढला निर्णय घेतला आहे. पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा अशी घोषणाच अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहराध्यक्षांनी केली होती.

अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले होते, की पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपुरला येत एक लाख मिळवा हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना करत आहे. पडळकर नागपुरात आले तर त्यांना आमच्या स्टाइलने धडा शिकवू असा इशाराही पवार यांनी दिला होता.

NCP News : ‘पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा’; अजित पवार गटाची घोषणा

फडणवीस विखेंनीही टोचले कान

दरम्यान, पडळकरांच्या या टीकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. खुद्द देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांचे कान टोचले होते. त्यांनी आपल्या जिभेला आवर घालावा असा सल्ला दिला होता. त्यांचा हा सल्ला कामी आल्याचे दिसत आहे. त्यानंतर अजून तरी पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्याचे दिसले नाही.

 

follow us