Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता बरसायला सुरूवात केली. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबईतही (Mumbai Rain) मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी येथील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, बीएमसीने (BMC) हायअलर्ट जारी केला.
Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज तर नाशिक पालघरला रेड अलर्ट; पावसाची स्थिती काय?
मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. उद्याही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आयएमडीने जारी केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील कार्यकारी अभियंत्यांना प्रभाग नियंत्रण कक्षात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
प्रत्येक वॉर्डीतील एका अधिकाऱ्याला पुढील सर्व अपडेट्ससाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग SWD कर्मचाऱ्यांनानी निर्जलीकरण पंप चालू आहेत की नाही याची खात्री करण्यास सांगण्यात आलं.
आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना आज रात्री आपल्या परिमंडळात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिकारी वैयक्तिकरित्या आपापल्या भागात वैयक्तिकरित्या लक्ष ठेवतील आणि वॉर्ड तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवतील, अशा सूचना महापालिकेनं दिल्या.
गुरुवारी सकाळपर्यंत अलर्ट
IMD ने उद्या सकाळी 8.30 पर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण आणि गोव्यात 26 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने आपल्या बुलेटिनमध्ये लिहिले आहे की गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे, रायगड अन् रत्नागिरीली सतर्कतेचा इशारा…
दरम्यान, हवामान विभागाने २६.०९.२४ साठी पुणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असं आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं.
दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
मुंबईत गेल्या 1 तासापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली मुंबई विमान हैदराबादकडे वळवण्यात आले आहे. खराब हवामानामुळे विस्तारा कंपनीचं विमान हैदराबादला वळवण्यात आले. मुंबईत लॅंडिंग होऊ शकणार नसल्याने हे विमान हैदराबादला रवाना करण्यात आलं. विस्ताराची कंपनीची दोन विमाने ॉमुंबईऐवजी हैदराबादला वळवण्यात आली आहेत.