Anil Deshmukh on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होता. आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिलं, असा आरोप लावायला मला सांगितलं गेलं होतं असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवला होता. एक प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितलं होतं. उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करा आणि ईडीच्या कचाट्यातून तुमची सुटका करून घ्या अशी ऑफर होती. पण मी नकार दिल्याने ईडी सीबीआय मागे लावून मला अटक करण्यात आली, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला.
Anil Deshmukh : भाजपचा दबाव पण मी समझोता, पवारांच्या विधानाला दुजोरा देत देशमुखांचा गौप्यस्फोट
श्याम मानव यांनी दावा केला होता की तुम्हाला चार प्रतिज्ञापत्र मागण्यात आले होते. त्या बदल्यात तुमची ईडीच्या प्रकरणातून सुटका केली जाईल अशी ऑफर देण्यात आली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडकवा आणि तुमची सुटका करून घ्या अशी ऑफर तुम्हाला होती, असे विचारले असता देशमुख यांनी याला दुजोरा दिला.
देशमुख म्हणाले, तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अतिशय जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. माझं फडणवीसांशी फोनवर बोलणं करवून दिलं. त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं की या चार मुद्द्यांचं अॅफेडेव्हिट करून द्या. त्या चार मुद्द्यांचं मी तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून दिलं असतं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अडचणीत आले असते. पण, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुख कुणावरही खोटे आरोप करणार नाही. मी नकार दिल्यामुळे माझ्यामागे ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली.
महापालिकेच्या निवडणुकीत पैसे मागितले असा खोटा आरोप उद्धव ठाकरेंवर लावायचा. अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर खोटे आरोप लावायचे असे त्यांनी मला तीन वर्षांपूर्वी सांगितले होते. जे अॅफेडेव्हिट करून देण्यास मला सांगितले होते त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. माझ्याकडे कोण माणूस आला होता. वेळ आल्यावर मी तुम्हाला सगळं सांगेन.
मला ऑफर होती, पण.., अजितदादांच्या दाव्यावर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
त्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांनीच पाठवलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती. त्यावेळेस उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मी जर त्याच वेळी अॅफेडेव्हिट करुन दिलं असतं तर महाविकास आघाडी सरकार तेव्हाच कोसळलं असतं. नंतर त्यांनी असंही सांगितलं होतं की अजित पवार तुमच्या पक्षाचे आहेत त्यांच्याबद्दल अडचण वाटत असेल तर त्यांना बाजूला ठेवा पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करा असे अनिल देशमुख म्हणाले.