शहापूर : राज्यात एकीकडे शहराचा विकास होतो आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक पाड्या, वस्त्यांमध्ये रस्त्यांचीही सोय नाही. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या याच दुर्लक्षपणामुळं आरोग्य केंद्रापर्यंत जायला रस्ताच नसल्यानं एका गरोदर महिलेला झोळीतूनच आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, वाटेतच उघड्यावर तिची प्रसूती (maternity) झाली. हा प्रकार रविवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील पटकीचा पाडा इथं घडला. (woman giving birth on road)
शहापूर तालुक्यातील पटकीचा पाडा येथून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कसारा ते वेळूकतपर्यंत रस्ता आहे. मात्र, पटकीचा पाडा ते वेळूक या किमान चार ते पाच किमी अंतराचा रस्ताच नसल्यानं पटकीच्या पाड्यातील गंभीर रुग्णांना झोळी शिवाय पर्याय नसतो. रस्ता नसल्यामुळं येथील रुग्णांना रुग्णालयाचा खडतर प्रवास पायीच करावा लागतो. अनेक अडचणींना त्यांना सामोर जावं लागतं. असंच काहीस या महिलेच्या बाबतीत झालं.
पटकीचा पाडा येथील प्रणाली वाघे (२०) यांना रविवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. पटकीचा पाडा येथून तिला चार किमी पायपीट करत झोळीतून वेळूकपर्यंत नेले जात असतांना वाटेतच उघड्यावर त्यांची प्रसूती झाली. सोबतच्या महिलांनी प्रणालीला सावरले व तिला धीर दिला.
या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहीत आहे. दरम्यान, हे बाळ निरोगी असून आता त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा सेविका यांनी वेळूत येथे वाहन उपलब्ध करून दिले होते. त्या वाहनातून प्रणालीचा कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर गर्भवती महिला आणि बाळ दोघांची प्रकृती ठीक असल्याचं तेथील डॉ. सुवेदिका सोनवणे यांनी सांगितलं.
रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही
पटकीचा पाडा हा शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम परिसर आहे. हा आदिवासी पाडा असल्याने या गावात पुरेशा सुविधा नाहीत. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून या गावात काँक्रीटचा रस्ता व्हावा, अशी मागणी होत होती, मात्र 2018 मध्ये मंजूर झालेला वेळूक ते पटकीचा पाडा हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. रस्ता होण्यासाठी कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच झाले नाही. विशेषत: पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.