5 Passanger Death In Delhi Bus Catches Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किसान (Bus Catches Fire) पथवर एका बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी उडी मारून आपले प्राण वाचवले. लखनऊमध्ये चालत्या बसमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बिहारहून दिल्लीला (Delhi) जात होती. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू (Delhi Bus Fire) झालाय. मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहेत. अपघातावेळी 80 प्रवासी बसमध्ये होते, त्यापैकी अनेकांनी उडी मारून प्राण वाचवल्याचं सांगण्यात येतंय.
दक्षिण विभागातील मोहनलालगंज पोलिस स्टेशन परिसरातील किसान पथवर एका डबल-डेकर बसला भीषण आग लागली. त्यानंतर अर्धा डझन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मोहनलालगंज आणि पीजीआयसह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी उपस्थित होता.
पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक- UP17AT6372 बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बिहारमधील बेगुसराय येथून दिल्लीला निघाली. रात्री 12 वाजता प्रवाशांना गोरखपूरमध्ये बसवण्यात आले. गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास लखनौ आउटर रिंग रोड (किसान पथ) वर काटे भिट गावाजवळ आग लागली. बसमध्ये पडदे होते. यामुळे आग वेगाने पसरली. आगीत प्रवासी अडकले होते. चार मृतांची ओळख पटली आहे. तर मृतांपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतली अपघाताची दखल
दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, लखनऊ जिल्ह्यात बसला आग लागल्याने झालेल्या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले.