India Restaurant Hygiene Survey Localcircles Report : कुटुंबासोबत बाहेर जेवायला जायचं म्हटलं की, आपण शक्यतो एखादं चांगलं, वातानुकूलित आणि चकाचक रेस्टॉरंट निवडतो. आकर्षक इंटिरियर, स्वच्छ टेबल, एसीचा गारवा आणि महागडं मेन्यू पाहिल्यानंतर तिथलं जेवणही तितकंच स्वच्छ आणि सुरक्षित असेल, असा सहज समज होतो. मात्र, रेस्टॉरंटची बाहेरची चकाचक आणि त्याच्या किचनमधील स्वच्छता यांचा काही संबंध असेलच असं नाही. LocalCirclesच्या ताज्या सर्व्हेतून देशभरातील रेस्टॉरंटच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक चित्र समोर आलं आहे.
‘नो इन्शुरन्स, तर नो पेट्रोल’ पण, गाडीचा विमा आहे की नाही सरकारला कळणार कसं?
91 हजार ग्राहकांनी केली पोलखोल
या सर्व्हेमध्ये देशातील 244 जिल्ह्यांमधील 91 हजारांहून अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला. यामध्ये 64 टक्के पुरुष आणि 36 टक्के महिलांचा समावेश होता. मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंतच्या ग्राहकांचा या सर्व्हेत सहभाग होता. ग्राहकांना त्यांच्या परिसरातील एसी रेस्टॉरंटमधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यातून समोर आलेली आकडेवारी रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्या प्रत्येकासाठी डोळे उघडणारी आहे.
एसी रेस्टॉरंटची स्वच्छता खरंच चांगली असते का?
सर्व्हेनुसार, केवळ 32 टक्के ग्राहकांनी त्यांच्या शहरातील एसी रेस्टॉरंटमधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची पातळी ‘चांगली’ किंवा ‘उत्कृष्ट’ असल्याचं सांगितलं. यामध्ये केवळ 4 टक्के ग्राहकांना स्वच्छता ‘उत्कृष्ट’ वाटली, तर 28 टक्के लोकांनी ती ‘चांगली’ असल्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडे 42 टक्के ग्राहकांनी रेस्टॉरंटची स्वच्छता केवळ सरासरी असल्याचं सांगितलं. तर 9 टक्के ग्राहकांनी ती ‘खराब’ किंवा ‘अत्यंत खराब’ असल्याचं स्पष्ट केलं. म्हणजेच रेस्टॉरंट कितीही महागडं किंवा चकाचक दिसत असलं तरी त्यामागची स्वच्छता ग्राहकांच्या अपेक्षेइतकी चांगली नसल्याचं चित्र आहे.
10 पैकी जवळपास 6 ग्राहकांनी पाहिल्या समस्या
सर्व्हेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 57 टक्के ग्राहकांनी गेल्या 12 महिन्यांत रेस्टॉरंटच्या डायनिंग एरिया, किचन किंवा वॉशरूममध्ये अस्वच्छता स्वतः पाहिल्याचं सांगितलं. म्हणजेच हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या 10 पैकी जवळपास 6 ग्राहकांच्या नजरेस काही ना काही अस्वच्छता पडली आहे. याशिवाय 53 टक्के ग्राहकांनी कर्मचाऱ्यांकडून अन्नाची अस्वच्छ पद्धतीने हाताळणी होताना पाहिली. तितक्याच म्हणजे 53 टक्के लोकांनी स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताना पाहिलं. तर 50 टक्के ग्राहकांनी अन्न अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये गरम किंवा सर्व्ह करताना पाहिलं, जे फूड-ग्रेड किंवा मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित नसू शकतात.
‘100%’ लिहिलं म्हणजे उत्पादन 100% शुद्ध असतंच असं नाही.. FSSAI चे नियम अन् गाइडलाइंन्स काय?
झुरळं, उंदीर, माशा अन् शिळं अन्न
रेस्टॉरंटच्या स्वच्छतेबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्व्हेत सहभागी 45 टक्के ग्राहकांनी झुरळे, उंदीर, माशा किंवा इतर कीटक रेस्टॉरंटमध्ये पाहिल्याचं सांगितलं. तितक्याच म्हणजे 45 टक्के लोकांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य वेगळी व्यवस्था नसल्याचं पाहिलं. तर 40 टक्के ग्राहकांनी शिळं किंवा वारंवार गरम केलेलं अन्न आढळल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे, सर्व्हेनुसार 10 पैकी 9 पेक्षा जास्त ग्राहकांनी गेल्या वर्षभरात किमान एक तरी स्वच्छता किंवा अन्नसुरक्षेची समस्या स्वतः पाहिली आहे. केवळ 5 टक्के लोकांनी यापैकी एकही समस्या पाहिली नसल्याचं सांगितलं.
ग्राहकांना सर्वाधिक भीती कशाची?
रेस्टॉरंटमध्ये जेवताना ग्राहकांना सर्वाधिक चिंता अस्वच्छ किचन, डायनिंग एरिया आणि वॉशरूमची आहे. तब्बल 79 टक्के ग्राहकांनी याला आपली प्रमुख चिंता असल्याचं सांगितलं. यानंतर 74 टक्के ग्राहकांना शिळं किंवा उरलेलं अन्न पुन्हा वापरलं जाण्याची, तर 72 टक्के लोकांना स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जाण्याची चिंता आहे. 63 टक्के ग्राहकांना मुदत संपलेले किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले पदार्थ वापरण्याची भीती आहे.
याशिवाय 61 टक्के लोकांना झुरळे, उंदीर आणि इतर कीटकांची, तर 61 टक्के लोकांना कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची चिंता आहे. 60 टक्के ग्राहकांनी असुरक्षित प्लास्टिकमध्ये अन्न गरम करण्याबाबत, तर 47 टक्के लोकांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची सरमिसळ होण्याबाबत चिंता व्यक्त केली.
UPI यूजर्ससाठी मोठी बातमी! पैसे पाठवण्यापूर्वी दिसू शकतो ‘YES/NO’ अलर्ट…
महाराष्ट्रातील कारवाईनेही उघड झाली होती अशीच स्थिती
LocalCirclesचा हा सर्व्हे अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाकडून रेस्टॉरंट्स आणि क्लब्सची तपासणी सुरू आहे. काही प्रतिष्ठित क्लब आणि रेस्टॉरंट्सच्या तपासणीत झुरळे-माशांचा प्रादुर्भाव, मुदत संपलेले खाद्यपदार्थ, सडलेल्या भाज्या, अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या, साचलेलं पाणी आणि अन्नाची अयोग्य साठवणूक यांसारख्या त्रुटी आढळल्या आहेत. म्हणजेच सर्व्हेत ग्राहकांनी सांगितलेलं चित्र आणि अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या तपासणीत समोर आलेल्या त्रुटींमध्ये मोठं साम्य दिसून येतं.
संसदेतली आकडेवारीही चिंता वाढवणारी
अन्नसुरक्षेबाबतची चिंता केवळ सर्व्हेपुरती मर्यादित नाही. संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात तपासलेल्या 2,23,808 अन्न नमुन्यांपैकी 40,023 नमुने असुरक्षित, निकृष्ट किंवा चुकीच्या लेबलिंगचे आढळले. म्हणजेच तपासलेल्या नमुन्यांपैकी जवळपास प्रत्येक पाचवा नमुना काही ना काही कारणाने नियमांच्या कसोटीवर अपयशी ठरला.
फळं अन् भाज्यांवर झुरळांचा सुळसुळाट, मुंबईत Blinkit स्टोअरवर FDAची कारवाई
हॉटेलचं हायजीन रेटिंग सार्वजनिक करण्याची मागणी
रेस्टॉरंटच्या स्वच्छतेबाबत ग्राहक आता अधिक पारदर्शकता आणि कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सर्व्हेनुसार 74 टक्के ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये आणि फूड डिलिव्हरी अॅपवर हायजीन रेटिंग सार्वजनिकपणे दाखवण्यात यावं, असं वाटतं. तर 72 टक्के लोकांनी दर तीन महिन्यांनी रेस्टॉरंटची स्वच्छता तपासणी करण्याची मागणी केली आहे. 71 टक्के ग्राहकांनी वारंवार नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंटवर कठोर दंडाची मागणी केली आहे. 69 टक्के लोकांनी असुरक्षित प्लास्टिकमध्ये अन्न गरम करण्यावर बंदी घालण्याचं समर्थन केलं. याशिवाय 68 टक्के ग्राहकांना नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंट्सची नावं सार्वजनिक करावीत, तर 66 टक्के लोकांना गंभीर अन्नसुरक्षा उल्लंघन आढळल्यास संबंधित रेस्टॉरंटचा परवाना तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी केली आहे.
पुढच्या वेळी हॉटेलमध्ये जाताना काय पाहाल?
LocalCirclesच्या ताज्या सर्व्हेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा तुम्ही प्लान करत असाल तर, केवळ आकर्षक इंटिरियर, स्वच्छ टेबल, एसीचा गारवा आणि महागडं मेन्यू पाहिल्यानंतर तिथलं जेवणही तितकंच स्वच्छ आणि सुरक्षित असेल असा समज अजिबात करून घेऊ नका. तर, शक्य असल्यास हॉटेलचं FSSAI लायसन्स किंवा हायजीन रेटिंग तपासा. टेबल, ग्लास, प्लेट्स आणि वॉशरूमची स्वच्छता आहे की नाही ते पाहा. अन्नाचा वास, रंग किंवा चव संशयास्पद वाटल्यास ते खाणं टाळा. कारण हॉटेल कितीही महागडं असलं, इंटिरियर कितीही चकचकीत असलं किंवा बिल कितीही मोठं असलं तरी, त्यातून अन्न सुरक्षित असल्याची हमी मिळत नाही.
