DGCA issues advisory to airlines over surge in pricing and waiving cancellation charges : पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी (Pahalgam) हल्ल्यानंतर देशभरात सर्व प्रकारच्या खबरदारी आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना श्रीनगर मार्गावर विमान भाड्यात वाढ होणार नाही याची खात्री करण्यास सांगितलं आहे. मंत्रालयाने सांगितलं की, विमान कंपन्या श्रीनगरसाठी अतिरिक्त उड्डाणं देखील चालवतील. दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील एका प्रमुख पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक पर्यटक होते आणि अनेकजण जखमी झाले.
विमान कंपन्यांनी तिकिटांचं वेळापत्रक बदलणं आणि रद्द करण्याचं शुल्कही माफ केलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि श्रीनगर मार्गावरील भाडेवाढीविरुद्ध कडक सूचना जारी केल्या. बुधवारी (२३ एप्रिल) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडू नये यासाठी विमान कंपन्यांना नियमित भाडे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Aftermath of Pahalgam terror attack, DGCA issues advisory to airlines over surge in pricing and waiving cancellation charges: DGCA pic.twitter.com/GHzerH1NSw
— ANI (@ANI) April 23, 2025
अतिरिक्त विमानांची संख्या
नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तातडीच्या मदत उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमाने, दोन दिल्लीला आणि दोन मुंबईला पाठवण्यात आली आहेत. अतिरिक्त विमाने तयार ठेवण्यात आली आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे. नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करण्याचं आणि जवळून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही निवेदनात म्हटलं आहे. एअर इंडिया श्रीनगर ते दिल्ली सकाळी ११.३० वाजता आणि श्रीनगर ते मुंबई दुपारी १२.०० वाजता विमानसेवा चालवेल. एअर इंडिया दिल्ली आणि मुंबईहून श्रीनगरला दररोज पाच उड्डाणे चालवते. या क्षेत्रांमध्ये ‘पुष्टी केलेले बुकिंग’ असलेल्या प्रवाशांना ३० एप्रिलपर्यंत मोफत रीशेड्युलिंग आणि रद्द केल्यास पूर्ण परतफेड देखील एअरलाइन देत आहे.
रद्द केल्यावर पूर्ण परतफेड
इंडिगोने म्हटलं आहे की, श्रीनगरमधील सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनी प्रवासासाठी रीशेड्युलिंग किंवा रद्द करण्याचा पर्याय ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे, जो २२ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या बुकिंगसाठी लागू होता. ‘शिवाय, आम्ही आज, २३ एप्रिल रोजी श्रीनगरला आणि श्रीनगरहून दोन उड्डाणे चालवत आहोत, एक दिल्लीहून आणि एक मुंबईहून, असं एअरलाइनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर म्हटलं आहे.