Azam Khan : द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने आझम खान यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2019 मध्ये सपा नेते आझम खान यांच्यावर रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आझम खान यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. आझम खान सपा-बसपा युतीचे लोकसभा उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान आझम खान यांनी त्यांच्या एका जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
यानंतर व्हायरल व्हिडिओची दखल घेत एडीओ पंचायत अनिल चौहान यांनी आझम खान यांच्याविरोधात शहजाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून आझम खान यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, नंतर या प्रकरणात आझम खान यांना कोर्टातून जामीन मिळाला होता.
पाकिस्तानी व्यक्ती सीमा ओलांडून भारतात घुसला, बीएसएफ जवानांनी पकडले आणि नंतर…
या प्रकरणी न्यायालयात दोन्ही बाजूंनी सर्व युक्तिवाद मांडण्यात आला होता, फक्त निर्णय येणे बाकी होते. त्यासाठी आज 15 जुलै ही तारीख न्यायालयाने निश्चित केली होती. यापूर्वी 2022 मध्ये रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने आझम यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता.
या वर्षाच्या सुरुवातीला आझम यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे विधानसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार तांडा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्याचबरोबर आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व 2022 मध्येच रद्द करण्यात आले होते.
नुकतेच राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधताना आझम खान म्हणाले होते की, आम्ही विद्यापीठे आणि शाळा बांधल्या आहेत. मात्र, लोकांना हे सहन होत नाही. लोक (भाजप) त्यांचा छळ करत आहेत. आझम खान यांच्या विरोधात कलम 171G, कलम 505(1)B आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.