IND vs WI : अश्विनच्या फिरकीपुढे कॅरेबिअनची शरणागती, पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 07 15 At 7.51.12 AM

IND vs WI : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी झाली. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 421 धावांवर पहिला डाव घोषित केला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात केवळ 130 धावांवर आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने 7 विकेट्स घेतल्या. (ind-vs-wi-Ashwin’s spin Caribbean capitulates India’s resounding win over West Indies in first Test)

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संघ पहिल्या डावात 150 धावांवर बाद झाला. अश्विनने या डावात भारताकडून 5 बळी घेतले. यानंतर भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या कर्णधार रोहित आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने संघाला सर्वोत्तम सुरुवात करून देण्याचे काम केले.

रोहित आणि यशस्वी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. रोहित 103 धावांची उत्कृष्ट खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वीच्या बॅटने 171 धावांची ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली. याशिवाय विराट कोहलीनेही 76 धावांची खेळी केली. आणि रवींद्र जडेजा 37 धावा करून नाबाद परतला. भारतीय संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 421 धावा करून डाव घोषित केला, त्यामुळे 271 धावांची आघाडी घेतली.

यशस्वीसमोर वेस्टइंडिज ‘अयशस्वी’, दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाची सामन्यावर पकड मजबूत

अश्विनच्या फिरकीत वेस्ट इंडिजचे फलंदाज पुन्हा अडकले

तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय संघाचा डाव घोषित झाला तेव्हा दिवसाचा खेळ संपण्यास जवळपास 50 षटके शिल्लक होती. यानंतर आपल्या फिरकीची जादू दाखवत अश्विनला विंडीज संघाचा दुसरा डाव गुंडाळण्यास जास्त वेळ लागला नाही. 58 धावसंख्येपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर संपूर्ण संघ 130 धावांवर बाद झाला. अश्विनने कारकिर्दीत 34व्यांदा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला, तर 8व्यांदा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यात 171 धावांच्या खेळीसाठी यशस्वीला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.

Tags

follow us