Download App

बिहारी राजकारणात ट्विस्ट! नितीशकुमारांच्या जुन्या सहकाऱ्याचा पक्ष लाँच; १४० जागा रडारवर..

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटवर्तीय म्हणून (Nitish Kumar) ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘आप सबकी आवाज’ असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. गुरुवारी राजधानी पटना शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दिवाळीचा सण आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असल्याने पक्षाची घोषणा करण्यासाठी 31 ऑक्टोबर हा दिवस निश्चित केल्याचे आरसीपी सिंह यांनी सांगितले. जेडीयूबरोबरील संबंध कसे होते यावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. कधीकाळी आरसीपी सिंह जेडीयूचे अध्यक्ष होते. मात्र नितीशकुमार यांच्यावरील नाराजीनंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

विधानसभा निवडणुक लढणार

आरसीपी सिंह यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Bihar Assembly Elections 2025) त्यांचा पक्ष लढणार आहे. 243 पैकी 140 मतदारसंघांत संभाव्य उमेदवार पक्षाकडे आताच आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील दारूबंदी कायदा आणि शिक्षण संस्थांची ढासळत चाललेली स्थिती यांचा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

कोण आहेत आरसीपी सिंह

आरसीपी सिंह मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नालंदा या जिल्ह्यातून येतात. उत्तर प्रदेश कॅडरचे ते आयएएस अधिकारी होते आणि केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पहिल्यांदा त्यांचा आणि नितीशकुमार यांचा संपर्क झाला होता. सन 2005 मध्ये सत्तेत आल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्य सचिव म्हणून आरसीपी सिंह यांना बिहारमध्ये येण्यास राजी केले. आरसीपी सिंह यांचे प्रशासकीय कौशल्य पाहून नितीशकुमार चांगलेच प्रभावित झाले होते.

नितीशकुमार आणि आरसीपी सिंह संबंध बिघडले

सन 2010 मध्ये आरसीपी सिंह यांनी सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आणि जेडीयूमध्ये प्रवेश केला. यानंतर सलग दोन वेळेस त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. पुढे 2021 मध्ये नितीशकुमार आणि आरसीपी सिंह यांचे संबंध बिघडले. 2021 मध्ये आरसीपी सिंह मोदींच्या कॅबिनेट मध्ये सहभागी झाले होते. ही गोष्ट नितीशकुमार यांना आवडली नव्हती. त्यावेळी नितीशकुमार यांना संशय होता की त्यांचाच शिष्य तोडफोडीचा प्लॅन तयार करत आहे.

पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतरच्या काही महिन्यातच त्यांना अध्यक्ष पद सोडावे लागले. इतकेच नाही तर त्यांना मंत्रिपद देखील सोडावे लागले. भाजपच्या सांगण्यावरून सिंह पक्षात फाटाफूटीचा प्लॅन तयार करत असल्याची अफवा कार्यकर्त्यांत पोहोचली होती. आर्थिक हेराफेरीच्या आरोपात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या कारणांमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला होता.

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

पुढे एक वर्षांच्या काळानंतर आरसीपी सिंह भाजपात सहभागी झाले. त्यावेळी नितीशकुमार एनडीए मध्ये नव्हते. यानंतर एक वर्षानंतर नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आघाडी करण्याचा निर्णय घेतला. आजमितीस नितीशकुमार यांचा जेडीयू केंद्र सरकारमध्ये एक महत्वाचा घटक पक्ष आहे.

follow us