Download App

Bihar Politics : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे CM; भाजपाच्या तिघांनी घेतली शपथ

Bihar Politics : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. नितीश कुमार यांनी मागील 24 वर्षात नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात असा योग साधणारे नितीश कुमार हे एकमेव नेते आहेत. नितीश कुमार यांच्यानंतर भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री आणि अन्य सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

बिहारनंतर महाराष्ट्रातही India Alliance ची शकले होणार! भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

बिहारमधील महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडत नितीश कुमार यांनी आज राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची (भाजप) इच्छा असेल तर आजच नव्या सरकारचा शपथविधी होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही वेळ न दवडता होकार दिला आणि आजच नितीश कुमार यांच्यासह भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.  याव्यतिरिक्त भाजपाचे डॉ. प्रेमकुमार, जेडीयूचे विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रावण कुमार, हम पक्षाचे संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज सकाळीच बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली होती. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावाही केला होता.

INDIA आघाडीला बिहार अन् महाराष्ट्रात होत्या मोठ्या अपेक्षा; भाजपने दोन्हीकडचे राजकारण सेट केले!

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत ताणलेले संबंध, इंडिया आघाडीत होत असलेले दुर्लक्ष, जागा वाटपाला काँग्रेस घेत असलेला वेळ, इंडिया आघाडीचे शिल्पकार पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा नाही, अशा विविध कारणांनी नितीश कुमार नाराज झाल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर मागील तीन दिवसांपासून नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते बिहारमध्ये दाखल झाले होते. भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडेही पाटन्यामध्ये तळ ठोकून होते.

follow us