सोनभद्र : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एक भाजपचे (BJP) आमदार दोषी आढळले असून त्यांना तब्बल 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. रामदुलार गोंड असे त्यांचे नाव असून ते दुधी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय न्यायालयाने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सोनभद्र येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने हा निकाल दिला.
न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी गोंड यांना दोषी घोषित केले होते, त्यानंतर त्यांची तुरुंगातही रवानगी केली होती. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालानंतर रामदुलार गोंड यांची आमदारकी रद्द होणार आहे. त्यांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान मागता येणार आहे. (BJP MLA from Uttar Pradesh has been found guilty of raping a minor girl and has been sentenced to 25 years in prison.)
न्यायालयाच्या निकालानंतर पीडितेचे वकील विकास शाक्य यांनी सांगितले होते की, या प्रकरणात आरोपी पक्षाकडू न तडजोड करण्यासाठी पीडितेला पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते. एवढेच नाही तर विविध प्रकारच्या धमक्याही दिल्या होत्या.
शाक्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी आमदार रामदुलार सिंह गौर यांनीही पीडितेला लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी जाऊन धमकी दिली होती. प्रभावाचा वापर करून अनेक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचे सगळे मनसुबे फसले. मात्र पीडित पक्षाने आपल्या भूमिकेवर ठाम राहून खटल्यात बाजू मांडत राहिला.
बलात्कारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. अल्ट्रासाऊंडचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. डीएनए चाचणीसाठीही विनंती करण्यात आली होती, ती न्यायालयाने फेटाळली होती. या आधारे आरोपीने दुसऱ्या बाजूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आमच्या बाजूने निर्णय आला. आमदाराने केलेल्या सर्व चाली अपयशी ठरल्या.
पीडितेला प्रौढ असल्याचे सिद्ध करण्यासाठी कुटुंब रजिस्टरमध्ये संगनमत करून तिचे वय वाढवले होते. न्यायालयात हजर असताना पीडितेच्या जन्मतारखेची खात्री होऊ शकली नाही. मात्र, प्राथमिक शाळेच्या प्रमाणपत्रावरून पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले, असेही शाक्य यांनी सांगितले.