BJP : CM पद गेले अन् राजकारणही फिरले; खुर्ची गेलेल्या 11 पैकी 8 नेत्यांची नवी इनिंग!

BJP : CM पद गेले अन् राजकारणही फिरले; खुर्ची गेलेल्या 11 पैकी 8 नेत्यांची नवी इनिंग!

BJP News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP News) तीन राज्यात जबरदस्त यश मिळवले. मध्यप्रदेशात जोरदार वापसी केली तर राजस्थान आणि छत्तीसगढच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केले. या प्रचंड विजयानंतर भाजप राज्याची कमान कुणाच्या हातात देणार हा प्रश्न सात ते आठ दिवस कायम होता. पेच लवकर सुटत नव्हता. मग काय भाजप श्रेष्ठींनी तिन्ही राज्यात पक्ष निरीक्षक रवाना केले. या निरीक्षकांनी आमदारांच्या बैठका घेतल्या आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणाही केली. या तिन्ही राज्यात भाजपने आधीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाही. तर सामाजिक आणि राजकीय गणित जुळवत धक्कातंत्राचा वापर करत एकदम नवे उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसवले.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा विराजमान झाले. भाजपच्या या निर्णयामुळे वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान आणि रमण सिंह यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. या लोकांना पुढे संधी मिळेल की नाही हे आताच सांगता येत नाही पण भाजपने याआधी अनेक वेळा असे राजकीय डाव खेळले आहेत. अचानक मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काढून घेतल्याचाही काही जणांचा अनुभव आहे. आज आपण अशाच 11 माजी मुखमंत्र्यांची माहिती घेणार आहोत. तसेच आज हे राजकीय नेते नेमके काय करत आहेत हे ही जाणून घेणार आहोत.

Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM

उमा भारती

भारतीय जनता पार्टीच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या उमा भारती आज राजकीय विजनवासात गेल्या आहेत. उमा भारती यांनीच मध्य प्रदेशातील दिग्विजय सिंह यांच्या नेतत्वाखालील काँग्रेसचे सरकार हटवून भाजपचे सरकार आणले होते. त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यानंतर काही काळ मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली होती. आता मात्र त्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत.

विजय रुपाणी

विजय रूपाणी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र पक्षाने त्यांना अचानक पदावरून हटवले होते. यानंतरही रुपाणी पक्षात सक्रिय आहेत. सध्या त्यांच्याकडे पंजाब आणि चंदीगड प्रभारी पदाची जबाबदारी आहे.

बिप्लव कुमार देव

बिप्लव कुमार देव यांनी सलग चार वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. मात्र त्यांच्या विरोधात पक्षातील आमदारांनी थेट दिल्लीत येऊन तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे पक्षाने त्यांना कार्यकाळ पू्र्ण होण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदावरून हटवले. त्यानंतर पक्षाने त्यांचे पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेचे खासदार केले आहे.

भुवनचंद्र खंडुरी

भुवनचंद्र खंडूरी यांना बी. सी. खंडुरी या नावानेही ओळखले जाते. खंडूरी हे दोन वेळा उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच लोकसभेचे खासदार ही राहिले आहेत. आता मात्र खंडूरी राजकारणात सक्रिय नाहीत.

बी. एस. येदीयुरप्पा

दक्षिण भारतातील भाजपाचे दिग्गज नेते म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा. कर्नाटक राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. आताही येदीयुरप्पा पक्षात सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टी संसदीय मंडळाचे येदीयुरप्पा सदस्य आहेत. मुख्यमंत्रीपदावरून जरी त्यांना हटवले तरी भाजपाने त्यांना केंद्रात आणत त्यांचे पुनर्वसन केले.

रघुबर दास

रघुबर दास झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. राज्यात भाजपाचे सरकार गेल्यानंतर पक्षाने त्यांना ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त केले. सध्याच्या दिवसात रघुबर दास राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत.

भगतसिंह कोश्यारी

भगतसिंह कोश्यारी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यसभा आणि लोकसभेतही ते खासदार होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले. येथील त्यांची कारकीर्द मात्र चांगलीच वादग्रस्त राहिली. अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी घेतले तसेच काही वक्तव्यांमुळेही कोश्यारी अडचणीत आले होते. यानंतर पक्षाने त्यांना माघारी बोलावून घेतले. आता मात्र कोश्यारी राजकारणापासून दूर आहेत.

रमेश पोखरियाल निशंक

रमेश पोखरीयाल निशंक काही काळ उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय राजकारणात एन्ट्री घेतली. विविध महत्वाच्या पदांवर काम केले. सध्या निशंक खासदार आहेत.

सर्बानंद सोनोवाल

सर्बानंद सोनोवाल आधी आसाम राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांचा कार्यकाल यशस्वीरीत्या पूर्ण केला. निवडणुकीत भाजपने पुन्हा यश मिळवले. त्यामुळे सोनोवालच मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच भाजपने नवा डाव टाकला. सोनोवाल यांना दिल्लीच्या राजकारणात आणले आणि आसामच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसमधून भाजपात हिमंता बिस्वसर्मा यांना संधी दिली. सोनोवाल आता केंद्राच्या राजकारणात रूळल्याचे दिसत आहे. आताही पक्षाने त्यांना छत्तीसगढमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून पाठवले होते. सोनोवाल सध्या बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत.

त्रिवेंद्र सिंह रावत

त्रिवेंद्र सिंह रावत काही काळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. या पदावरून पायउतार झाल्यानंतरही पक्षात सक्रिय आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात रावत दिसत असतात.

तीरथ सिंह रावत

तीरथ सिंह रावत सिंह सुद्धा काही काळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना ही पक्षाने अचानक मुखमंत्री केले होते. त्रिवेंद्र सिंह रावत यांना हटवून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हटवून भाजपाने पुष्कर सिंह धामी यांच्या हाती राज्याची कमान दिली. आताही धामीच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर तीरथ सिंह रावत भारतीय जनता पार्टीचे लोकसभा खासदार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube