Bengal Results & BJP-TMC Friendship : पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारी एका महाकाय युगाचा अंत झाला आणि एका नव्या पर्वाची पहाट झाली. ज्या ममता बॅनर्जींनी एकेकाळी ‘माँ, माटी, मानुष’च्या घोषणेने डाव्यांचा 34 वर्षांचा किल्ला उद्ध्वस्त केला होता, आज त्याच ममता दीदींच्या सत्तेच्या साम्राज्याला भाजपने 180 अंशाच्या कोनातून फिरवून जमीनदोस्त केले आहे. 294 पैकी 207 जागा जिंकून भाजपने बंगालमध्ये स्वबळावर भगवा फडकवत नवा इतिहास रचला, तर तृणमूल काँग्रेस अवघ्या 80 जागांवर आकसली गेली. पण या निकालाचे सर्वात मोठे सत्य हे आहे की, आज बंगालमध्ये भाजपचे जे ‘कमळ’ बहरले आहे, त्याचे पहिले बीज 29 वर्षांपूर्वी स्वतः ममता बॅनर्जींनीच पेरले होते.
‘नैसर्गिक मैत्री’ ते ‘दुर्गा’ संबोधनापर्यंतचा प्रवास
आज भाजपला ‘बाहेरचे लोक’ म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी 1997 मध्ये जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडल्या, तेव्हा डाव्यांना संपवण्यासाठी त्यांनीच भाजपचा हात धरला होता. 1998 मध्ये भाजपचे तपन सिकदर जेव्हा पहिल्यांदा ‘दमदम’मधून लोकसभेवर निवडून आले, तेव्हा त्यांच्या विजयाचे शिल्पकार दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द ममता दीदी आणि त्यांचे तृणमूलचे कार्यकर्ते होते. तपन सिकदर भाजपने 1998 आणि 1999 या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. तपन सिकदर 1999 ते 2004 अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही होते.
इतकेच नव्हे, तर 2003 मध्ये संघाच्या ‘पाचजन्य’ सोहळ्यात जेव्हा त्यांना ‘बंगालची दुर्गा’ म्हणून गौरविण्यात आले, तेव्हा ममतांनी संघ नेत्यांचा उल्लेख ‘सच्चे देशभक्त’ असा केला होता. “भाजप हा आमचा नैसर्गिक मित्र आहे,” ही कबुली खुद्द दीदींनीच ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. आज त्याच ‘नैसर्गिक मित्राने’ ममतांच्या राजकारणाला बंगालमधून हद्दपार करण्याची किमया साधली आहे.
सोयीचे राजकारण आणि ‘इंडिया’ आघाडीचा घात
ममता बॅनर्जींचे राजकारण नेहमीच ‘सोयीचे’ राहिले आहे, अशी टीका आता राजकीय वर्तुळात उघडपणे होत आहे. ममतांनी सीएए-एनआरसीला रस्त्यावर उतरून विरोध केला, पण संसदेत मतदानावेळी टीएमसीचे 8 खासदार ‘गायब’ झाले, ज्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला. बंगालचे राज्यपाल म्हणून संघर्षात राहिलेल्या जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती करण्यासाठी ममतांनी अप्रत्यक्षपणे मदत केली. एवढेच काय तर, 2024 च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांच्या नावाला विरोध करून त्यांना भाजपच्या छावणीत ढकलणे आणि नंतर ‘इंडिया’ आघाडीशी काडीमोड घेऊन बंगालमध्ये एकटं लढण्याचा हट्ट धरणे, हे ममतांचे निर्णय त्यांच्याच अंगाशी आले आहेत.
सत्तेचा ‘अजगर’ आणि तृणमूलचे विसर्जन
ज्या पद्धतीने भाजपने बीजेडी, शिवसेना आणि जेडीयू सारख्या प्रादेशिक पक्षांच्या सोबतीने स्वतःचा विस्तार केला, त्याच ‘राजकीय अजगराने’ आता तृणमूल काँग्रेसलाही गिळंकृत केले आहे. ममतांनी स्वतःच्या हट्टापायी आघाडी तोडली आणि मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला. भाजपची 1998 मधील लोकसभेची 1 जागा आज 2026 मध्ये विधानसभेच्या 207 जागांपर्यंत पोहोचली आहे. एकूण काय तर, ममता बॅनर्जी आज जे काही भोगत आहेत, ते त्यांनीच गेल्या तीन दशकांत पेरलेल्या राजकारणाचे फळ आहे. ज्या भाजपला त्यांनी बोट धरून बंगालच्या गल्लीबोळाची ओळख करून दिली, त्याच भाजपने आज त्यांच्या सत्तेला सुरुंग लावून ‘दीदीं’चा अध्याय संपवला हे मात्र नक्की.
