India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध (India Pakistan Tension) थांबलं असलं तरी तणाव कायम आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलं आहे. दुसरीकडे बॉयकॉट पाकिस्तान मोहिमेने वेग घेतला आहे. यातच आता सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अॅथॉरिटीने देशातील ई कॉमर्स कंपन्यांना एक नोटीस धाडली आहे. यात अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अन्य कंपन्यांचा समावेश आहे. पाकिस्तानशी संबंधित झेंडे आणि सामान तत्काळ हटवण्यात यावे असे या नोटिसीत म्हटलं आहे.
सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने म्हटले आहे की ई कॉमर्स साइट्सवर पाकिस्तानी झेंडे आणि त्यांच्याशी संबंधित अन्य वस्तूंची विक्री म्हणजे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांनी अशा वस्तू तत्काळ हटवल्या पाहिजेत. याआधी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहून याबाबत चिंता व्यक्त केली होती. दोन्ही देशांत संघर्ष आणि तणाव असतानाही देशातील ई कॉमर्स साइट्सवर पाकिस्तानी झेंड्यासह अन्य वस्तू सर्रास विकल्या जात असल्याची बाब मंत्री गोयल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे या मागणीची दखल घेत सीसीपीएने या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी कंपन्यांना नोटीस धाडली आहे.
सीसीपीएच्या निर्देशाशी संबंधित माहिती ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना एक नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पाकिस्ताीनी झेंडे आणि त्याच्याशी संबंधित वस्तू विकण्याचा आरोप आहे. असे प्रकार आजिबात सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व ई कॉमर्स कंपन्यांनी अशा वस्तू तत्काळ हटवाव्यात आणि देशातील कायद्यांचे पालन करावे.
The CCPA has issued notices to @amazonIN, @Flipkart, @UbuyIndia, @Etsy, The Flag Company and The Flag Corporation over the sale of Pakistani flags and related merchandise. Such insensitivity will not be tolerated.
E-commerce platforms are hereby directed to immediately remove all… pic.twitter.com/03Q4FOxwCX— Pralhad Joshi (@JoshiPralhad) May 14, 2025
भारतात सध्या पाकिस्तानच्या कृत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केल जात आहे. पाकिस्तानला साथ देणाऱ्या देशांच्या वस्तूंवरही बहिष्काराची मोहिम सुरू झाली आहे. याचा फटका तुर्की आणि अजरबैजान या देशांना बसला आहे. यात सर्वात जास्त फटका तुर्कीला बसत आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीतून येणारे सफरचंद घेण्याचे बंद केले आहे. पर्यटनासाठी तुर्की प्रसिद्ध आहे. भारतातून दरवर्षी हजारो पर्यटक तुर्कीला भेट देत असतात. परंतु, आता ट्रॅव्हल कंपन्यांनीही तुर्कीचे पॅकेजेस रद्द केलेआ आहेत.