History Of Cockroach : सध्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि ‘X’ (ट्विटर) वर फक्त आणि फक्त ‘कॉक्रोच जनता पार्टी’चीच चर्चा रंगली आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने या पार्टीचे फॉलोअर्स वाढत आहेत. पण, या संपूर्ण राजकीय आणि डिजिटल वादळाच्या केंद्रस्थानी असलेला ‘कॉक्रोच’ नेमका काय चीज आहे? घराच्या कोपऱ्यात किंवा किचन ओट्याखाली दिसताच ज्याला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते, ज्याला मारण्यासाठी आपण ‘हिट’ किंवा औषधं शोधतो, तो दिसायला जितका साधा आणि किळसवाणा वाटतो, तितका तो नाही. विज्ञानाच्या जगात झुरळ हा पृथ्वीवरील सर्वात खतरनाक आणि चिवट जीव मानला जातो. चला तर मग, आज राजकीय पक्षाला नाही, तर ‘खऱ्या’ कॉक्रोचच्या अद्भूत दुनियेला जाणून घेऊया.
डायनासोर आले आणि गेले, पण हा गडी आजही कायम
झुरळ हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या जिवंत कीटकांपैकी एक आहे. वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनानुसार, झुरळांचे अस्तित्व या पृथ्वीवर २० ते ३० कोटी वर्षांपेक्षाही जुने आहे. याचा अर्थ जेव्हा पृथ्वीवर महाकाय डायनासोर वावरत होते, तेव्हाही ही झुरळं त्यांच्या पायाखाली फिरत होती. निसर्गाच्या महाप्रलयात डायनासोर नष्ट झाले, पण झुरळांनी स्वतःला वाचवले आणि ती आजही जिवंत आहेत.
मुंडके छाटले तरी आठवडाभर जिवंत
झुरळाबद्दलचा सर्वात थरारक फॅक्ट म्हणजे, जर त्याचे डोके धडावेगळे केले, तरीही ते अनेक आठवडे जिवंत राहू शकते! याचे कारण असे की, झुरळ आपल्या तोंडाने श्वास घेत नाही, तर त्याच्या शरीरावर असलेल्या लहान-लहान छिद्रांमधून श्वास घेते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डोके नसताना त्याचा मृत्यू श्वास कोंडून नाही, तर तोंड नसल्यामुळे पाणी पिता न आल्याने होतो.
40 मिनिटे श्वास रोखून धरण्याची ताकद
झुरळ पाण्यात बुडून सहज मरत नाही. ते पाण्यात असताना किंवा संकट काळात तब्बल 40 मिनिटांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकते. त्यामुळे फ्लश केले तरी ते अनेकदा सुखरूप बाहेर येते.
उपवासाचा रेकॉर्ड आणि मेन्यूमध्ये चक्क ‘केस-भिंती’
झुरळ हे 100% सर्वभक्षी आहे. ते अन्न न खाता १ महिना जिवंत राहू शकते मात्र पाण्याशिवाय ते फक्त 1 आठवडाच जगू शकते. जर घरात काहीच खायला नसेल, तर झुरळ कागद, पुस्तकांचे कव्हर, डिंक, ग्रीस, साबण, लेदर, भिंतीची पुटी (पुताई) आणि चक्क माणसाचे गळलेले केससुद्धा खाऊन स्वतःचे पोट भरू शकते.
जगातील 4000 प्रजाती, पण घरात फक्त ‘इतक्याच’…
जगात कॉक्रोचच्या तब्बल 4000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. पण सुदैवाने, यातील केवळ 30 प्रजाती अशा आहेत ज्या किचन किंवा बाथरूममध्ये उपद्रव करतात. उर्वरित सर्व जंगलात निसर्गाचे चक्र चालवण्यास मदत करतात. एका सामान्य झुरळाचे आयुष्य साधारणपणे 1 वर्ष असते.
थोडक्यात काय तर सोशल मीडियावरील ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ज्या व्यवस्थेविरुद्ध आणि कठीण परिस्थितीविरुद्ध लढण्याची भाषा करत आहे, तो मूळ ‘कॉक्रोच’ स्वतःच निसर्गातील सर्वात मोठा ‘सर्व्हायव्हर’ (Survivor) आहे, ज्याला संपवणे अशक्यप्राय आहे. कदाचित म्हणूनच, प्रस्थापित राजकारणाला टक्कर देण्यासाठी या नव्या डिजिटल चळवळीला हे नाव अगदी चपखल बसले आहे.
