तामिळनाडूतील काँग्रेसचा ‘टीव्हीके’ला पाठिंबा म्हणजे ‘दिल्ली पॅटर्न’ची पुनरावृत्ती; धोका नेमका काय?

TVK-Congress तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने विजयच्या TVK पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

तामिळनाडूतील काँग्रेसचा 'टीव्हीके'ला पाठिंबा म्हणजे 'दिल्ली पॅटर्न'ची पुनरावृत्ती; धोका नेमका काय?

तामिळनाडूतील काँग्रेसचा 'टीव्हीके'ला पाठिंबा म्हणजे 'दिल्ली पॅटर्न'ची पुनरावृत्ती; धोका नेमका काय?

Congress Support To TVK In Tamil Nadu : राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे समीकरण अनेकदा फायद्याचे ठरते, पण कधीकधी हाच ‘मित्र’ आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकतो. काँग्रेस सध्या अशाच एका विचित्र कात्रीत सापडली आहे. दिल्ली आणि गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मिळालेली उभारी काँग्रेसच्या मुळावर आली, आता तोच पॅटर्न तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाच्या रूपाने पुन्हा रिपीट होण्याची भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण, तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने विजय जोसेफच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. नेमका काँग्रेसला TVK ला पाठिंबा देण्यामुळे कोणता फटका बसू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया…

रॅम्प वॉक ते राजभवन : बॉलिवूडला सजवणारी डिझायनर होणार बंगालची मुख्यमंत्री?

1. दिल्लीची ती ऐतिहासिक चूक आणि काँग्रेसचा ‘गेम’

दिल्लीत एकेकाळी शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते.  पण, 2013 मध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने नवख्या अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला.  त्याचा निकाल काय लागला? तर, काँग्रेसचा पाठिंबा घेऊन केजरीवाल मजबूत झाले. हळूहळू काँग्रेसचा पारंपरिक दलित, मुस्लिम आणि झोपडपट्टीतील वोट बँक पूर्णपणे ‘आप’कडे वळली. आज दिल्लीत काँग्रेस शून्यावर आली असून त्यांची राजकीय जमीन ‘आप’ने पूर्णपणे काबीज केली आहे.

2. तामिळनाडूमध्ये ‘विजय’ ठरणार काँग्रेससाठी ‘केजरीवाल’?

आता राझधानी दिल्लीत बसलेल्या फटक्यानंतरदेखील काँग्रेस दक्षिणेत म्हणजेच तामिळनाडूत तीच चूक पुन्हा करत आहेत. कारण, तामिळनाडूच्या राजकारणात विजय एक तरुण, लोकप्रिय आणि ‘अँटी-एस्टॅब्लिशमेंट’ म्हणजे सत्ताविरोधी चेहरा म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी येथे दोन मोठे धोके आहेत. एक म्हणजे विजय यांची प्रतिमा स्वच्छ आणि सामान्यांचा नेता अशी आहे. जर काँग्रेसने त्यांच्याशी युती केली किंवा त्यांना पाठिंबा दिला, तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार हळूहळू ‘टीव्हीके’कडे सरकू शकतो. दुसरं म्हणजे तमिळनाडूमध्ये काँग्रेस आधीच डीएमकेच्या (DMK) सावलीत आहे. आता विजय यांच्या रूपाने तिसरा भक्कम पर्याय उभा राहिल्यास काँग्रेसचे अस्तित्व केवळ कागदावरच उरेल  अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बंगालचा निकाल लागताच नड्डांचे विधान चर्चेत; भाजपने आतापर्यंत किती प्रादेशिक पक्षांना संपवलं?

3. गुजरातचा अनुभव : जिथे जिथे ‘आप’ आली, तिथे काँग्रेस गेली!

केवळ दिल्लीच नाही, तर गुजरातमध्येही ‘आप’च्या एन्ट्रीचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याऐवजी काँग्रेसलाच बसला. मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसची ऐतिहासिक पडझड झाली. आता विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष देखील तामिळनाडूमध्ये तीच भूमिका बजावू शकतो, ज्यामुळे द्राविडी राजकारणात काँग्रेसची उरलीसुरली जागाही धोक्यात येईल.

4. काँग्रेससमोरचं यक्षप्रश्न: युती की आत्मघात?

तामिळनाडूमध्ये सध्या सवाल फक्त विजय यांच्या सरकारचा नाही, तर काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा आहे. जर विजय सत्तास्थापनेत यशस्वी झाले, तर ते काँग्रेसच्या मतांवरच स्वतःचा किल्ला उभा करतील. त्यामुळे प्रादेशिक चेहऱ्याला मोठं करताना काँग्रेस स्वतःची जमीन तर गमावत नाही ना? हा प्रश्न आता दिल्लीतील धोरणकर्त्यांना सतावत आहे. थोडक्यात काय तर, काँग्रेसने वेळोवेळी प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात उभं करण्यासाठी बळ दिलं, पण शेवटी त्याच पक्षांनी काँग्रेसला गिळंकृत केलं. तामिळनाडूत अभिनेता विजय यांची वाढती लोकप्रियता ही काँग्रेससाठी ‘धोक्याची घंटा’ आहे. जर काँग्रेसने दिल्लीतील चुकांतून धडा घेतला नाही, तर तामिळनाडूमध्येही काँग्रेसला ‘राजकीय विजनवासात’ जावे लागू शकते असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Exit mobile version