Rahul Gandhi : संसद सभागृहातील घुसखोरी, विरोधी पक्षांतील खासदारांचं निलंबन त्यानंतर तृणमूलच्या खासदारकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री करण्याचा प्रकार या मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या कारभारावर आगपाखड केली. देशात बरोजगारी आहे हे मीडियात कधी दाखवलं गेलं नाही. मीडियाने यावर कधीच आवाज उठवला नाही. मीडियाने काय दाखवलं तर संसदेबाहेर खासदार बसले होते तिथे राहुल गांधींनी व्हिडिओ काढला. पण, यांनी दीडशे खासदारांना बाहेर काढण्यात (MP Suspended) आलं हा प्रश्न या मीडियानं विचारलाच नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीची रॅली आणि मेळाव्यात राहुल गांधी यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राहुल गांधी पुढे म्हणाले, संसदेत काही तरुणांनी उड्या मारत प्रवेश केला. आपण सगळ्यांनीच हे दृश्य पाहिलं. त्यानंतर त्यांनी सभागृहात धूर सोडला. भाजपाचे सगळे खासदार पळून गेले. जे स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात त्यांची तर हवाच निघाली. ते दृश्य टिव्हीवर दिसलं नाही पण आम्ही पाहत होतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ते तरुण आत कसे आले? संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्या तरुणांनी बरोबर येताना स्मोक कॅनही आणले होते. जर त्यांना गॅस सिलिंडर आत आणता आलं तर दुसरीही एखादी वस्तू ते आणू शकले असते.
दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी हे आंदोलन का केलं? त्याचं कारण काय होतं, तर बेरोजगारी. देशात भयंकर बेरोजगारी. या देशातील युवकांना रोजगार मिळत नाही. सर्वे करणारे जे लोक आहेत त्यांना मी सांगितलं की एक काम करा. कोणत्याही शहरात जा एक छोटासा सर्वे करून माहिती घ्या की देशातील युवक इन्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल साइट्सचा किती वेळ वापर करतात? नंतर हा सर्वे करण्यात आला. त्यातून उत्तर समोर आलं की दिवसातील साडेतास तास युवक या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करतात.
आम्ही संसदेच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला. बेरोजगारीवर प्रश्न विचारला. यांनी तर थेट दीडशे खासदारांना संसदेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. हे दीडशे खासदार फक्त व्यक्ती नाहीत तर देशातील नागरिकांचा आवाज आहेत. पण मीडियाला याच्याशी देणंघेणं नाही, अशी टीका त्यांनी केली.
Parliament winter session : चार दिवसांत तब्बल 92 खासदारांचे निलंबन; विरोधकांची नेमकी मागणी काय?