Download App

‘म्हणजे पाचशे वर्षांनंतर मनुवाद..,’; राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

Udit Raj News : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी सुरु असतानाच विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला (BJP) धारेवर धरलं जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या एका नेत्याने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. म्हणजे पाचशे वर्षानंतर मनुवाद पुन्हा येत असल्याचं काँग्रेस नेते उदित राज (Udit Raj) म्हटले आहेत. त्यांची ही पोस्ट पाहुन राम मंदिराच्या मुद्द्याकडेच रोख असल्याचं दिसून येत आहे. राज यांनी यासंदर्भातील एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते उदित राज पोस्टमध्ये म्हणाले, ‘म्हणजे पाचशे वर्षांनंतर मनुवाद पुन्हा येत आहे’ अशी पोस्ट करीत राज यांनी या पोस्टमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख न करता विधान केलं आहे. पाचशे वर्षांचं म्हणत त्यांचा निशाणा राम मंदिरावरच असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे.

येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठीचं निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे, अधीर रंजन चौधरी यांना देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह देशभरातून राजकीय क्षेत्रातील 6 हजारांपेक्षा अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशातच लोकसभा निवडणुकाही उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. निमंत्रण मिळाल्यानंतर सोनिया गांधी सोहळ्याला जाणार की नाही? याबाबत अद्याप काँग्रेसकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

Jan Man Survey : 10 वर्षातील भारताच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल काय वाटते? PM मोदींचा सवाल

देशभरात दिवाळीसारखा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण तयार करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यांतही कार्यक्रमांचं आयोजन करुन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना अधिकृतपणे निमंत्रण देण्यात आल्याची पुष्टी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.

सोनिया गांधींसह काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने राम मंदिराच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास देशभरात मुस्लिम मते विखुरण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती पक्षाला वाटत आहे. विधानसभा निवडणुकीत विविध राज्यांतील मुस्लिम मतदार काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांवर अधिक विश्वास व्यक्त करत आहेत. आता लोकसभा निवडणुकीत या वेळी मुस्लिम मतदार काँग्रेसकडे बघतील, अशी पक्षाला आशा असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, एकीकडे राम मंदिर सोहळ्याचं देशभरात वातावरण असतानाच आता काँग्रेस नेत्याकडून वादग्रस्त विधान करण्यात आलं आहे. अद्याप भाजपच्या नेत्यांकडून उदित राज यांच्या विधानाची दखल घेण्यात आली नसून या विधानावर भाजपचे नेते काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us