अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला.
दरम्यान, आता तिथे बांधण्यात येणाऱ्या मशीदीबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. इंटरनॅशनल न्यूज एजन्सी रॉयटर्सने इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील भव्य मशीदीचे बांधकाम यावर्षी मे महिन्यापासून सुरू होईल. तर पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. (construction of the grand mosque in Ayodhya will start from May this year. It will take three to four years to complete.)
मशीदीच्या प्रकल्पावर देखरेख करणाऱ्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या विकास समितीचे प्रमुख हाजी अराफत शेख यांनी सांगितले की, मशीदीसाठी लागणारे पैसे उभे करण्यासाठी क्राऊड-फंडिंग वेबसाइटही सुरू केली जाणार आहे. या मशीदीचे नाव पैगंबर मुहम्मद यांच्या नावावर ‘मशीद मोहम्मद बिन अब्दुल्ला’ ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
2019 मध्ये न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अद्यापही मशीदीचे बांधकाम पूर्ण का झाले नाही, असा सवाल विचारला असता आयआयसीएफचे सचिव अथर हुसेन यांनी सांगितले की, मशीदीच्या डिझाइनमध्ये अधिक पारंपारिक घटकांचा समावेश करायचा असल्याने बांधकामाला विलंब झाला आहे. आता लवकरात लवकर बांधकाम सुरु होऊन पुढील चार वर्षांमध्ये भव्य मशीद उभी राहील.
2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर निकाल दिला होता. यात वादग्रस्त जागेवर मंदिर बांधले जाईल असा निर्णय देत ही जागा हिंदू पक्षकारांना सोपविण्याचे आदेश दिले होते. तर मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा दिली जाईल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता मागील पाच वर्षांमध्ये तिथे भव्य राम मंदिर उभे राहिले आहेत. त्यानंतर आता येथे मशीदीचे काम सुरू होणार असून, लवकरच ती पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.