Download App

कर्नल सोफिया कुरेशीबद्दल वादग्रस्त वक्तव्य अन् आता मंत्री विजय शाह यांनी मागितली माफी

Colonel Sofia Qureshi :  कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने मंत्री विजय शाह यांच्यावर चारही बाजूने जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने (Congess) विजय शाह (Vijay Shah) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशीला ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण’ म्हटले होते. मात्र आता त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत असल्याने त्यांनी आता या प्रकरणात माफी मागितली आहे.

माझ्या स्वप्नातही मी कर्नल सोफिया यांच्याबद्दल चुकीचा विचार करू शकत नाही. मी सैन्याचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. सोफिया कुरेशी (Colonel Sofia Qureshi) यांनी जाती आणि धर्माच्या वर उठून देशाची सेवा केली आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मी त्यांना सलाम करतो असं माध्यामांशी बोलताना  मंत्री शाह म्हणाले.

माध्यमांशी बोलताना मंत्री शाह पुढे म्हणाले की, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी देखील सैन्याशी संबंधित आहे. ज्या बहिणींचे सिंदूर दहशतवाद्यांनी नष्ट केले होते त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मी हे विधान केले होते. जर मी उत्साहात काही चुकीचे बोललो असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.

तर दुसरीकडे या प्रकरणात काँग्रेसने मंत्री शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी मंत्री शाह यांचे विधान बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट होऊन सरकारसोबत उभा आहे, तेव्हा भाजपचे वरिष्ठ मंत्री अशा घृणास्पद गोष्टी बोलत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याला सलाम करतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात की आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवले. शेवटी, कोणाची बहीण? दहशतवाद्यांची बहीण? हे विधान कोणाचे होते? असं मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  जितू पटवारी यांनी म्हटले आहे. तसेच मंत्री शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि भाजपने या भावना शहांच्या होत्या की पक्षाच्या, हे स्पष्ट करावे, अशी मागणी पटवारी यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते मंत्री विजय शाह 

पहलगाममध्ये ज्यांनी आपल्या लोकांची निर्घृण हत्या केली होती त्यांना मारण्यासाठी मोदीजींनी त्यांच्या बहिणीला पाठवले.  त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारहाण केली आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले.

follow us