पुण्यातील काँग्रेसचे नेते पक्षात घेऊन भाजप कुणाचा गेम करणार ? भाजपमध्ये थोपटेंना काय मिळणार ?

Congess leader joining bjp: राज्यातील काँग्रेसच्या कटकटी संपविण्याचे नाव घेत दिसत नाही. पुण्यातील माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी जवळपास काँग्रेस (Congress) सोडण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार भाजपच्या (bjp) वाटेवर आहेत. गृहमंत्री अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर आले होते. या सगळ्या दरम्यान त्यांनी काँग्रेसचे मोठे ऑपरेशन केले आहे. याच ऑपरेशनचा परिणाम म्हणून संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू आहेत. काँग्रेसचे एक माजी मंत्री व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेला सहकारातील नेताही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन मोठे नेते पक्षात घेऊन भविष्यात भाजप कुणाचा गेम करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
अमित शाह हे पुणे मुक्कामी होते. हॉटेलमध्ये बैठका झाल्या आहेत. पुण्यातील काँग्रेसचा एक माजी मंत्री व सध्या राष्ट्रवादीत असलेला नेता, संग्राम थोपटे, याशिवाय विदर्भातील काँग्रेसचा एक माजी आमदार यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे पुण्यातील दोन माजी आमदार हे भाजपच्या गळ्याला लागणार आहे.
संग्राम थोपटेंना काँग्रेसने अनेकदा डावलले
संग्राम थोपटे यांचे कुटुंब निष्ठावंत काँग्रेसी म्हणून गणले जातात. त्यांचे वडिल अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे जुने-जाणते नेते आहेत. काँग्रेसवर निष्ठा आहे. त्यांना कुणीही धाडस करून विचारू शकत नाही. काँग्रेस सोडणार आहे का ? संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या 2014 पासून उठत आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांचा कारखाना अडचणीत येईल, तेव्हा तेव्हा ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असे बोलले जात आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी संग्राम थोपटे हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले होते. 2019 ते 2024 या कालावधीत त्यांना अनेकदा काँग्रेसकडून डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज असल्याचे दिसून येत होते.
2019 च्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांना सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली. संग्राम थोपटे यांचे नाव अंतिम झालेले होते. शपथविधीसाठी त्यांची सफारीही शिवून तयार होती. संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांना निरोप दिला होता, शपथविधी होणार होता म्हणून कार्यकर्त्यांना निरोप गेले होते. त्यांना शपविधीला येण्याचे निमंत्रणही देण्यात आले होते. अचानक कुठून तरी सूत्र फिरली आणि संग्राम थोपटे यांचे नाव कट झाले. मग चिडलेल्या थोपटे समर्थकांनी पुणे शहरातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. त्यानंतरही संग्राम थोपटे हे शांत राहिले आणि पक्षात राहिले आहे. आज आणि उद्या संधी मिळेल अशी त्यांना आशा होती.
दुसरी संधी त्यांची चालून आली होती. नाना पटोले हे जेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. तेव्हा विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हा संग्राम थोपटे हे विधानसभेचे अध्यक्ष होतील, अशी चर्चा होती. मात्र महाविकास आघाडी सरकार गेले तरी थोपटे यांची या पदावर वर्णी लागली नाही.
त्यामुळे संग्राम थोपटे खचले होते. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये फार खळबळ उडाली होती. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडे तिन्ही पक्षामधील नेत्यांची चलबिचल होती की आपल्याला बहुमत मिळेल की नाही यांची शंका होती. तरीही संग्राम थोपटे ठाम राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांचे जोरदार काम केले. त्यांना भोर विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भोरमधून आपला विजय नक्की आहे, असे संग्राम थोपटे यांना वाटत होते. 2024 विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले. त्यात भोरचाही समावेश होते. शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा दणदणीत पराभव केला. हा संग्राम थोपटेंसाठी मोठा धक्का होता. तरीही ते काँग्रेस सोडतील असे वाटत नव्हते.
काँग्रेस प्रदेशाध्यपदावरूनही डावलेले
नवा प्रदेशाध्यक्ष निवडतानाही संग्राम थोपटे यांचा विचार करण्यात आला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये निष्ठावान राहूनही आपल्याला डावलण्यात आले आहे. पदही मिळत नाही. संधी असताना डावलण्यात येत आहे, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे.
त्यांच्यासमोर अडचण होती ती राजगड सहकारी साखर कारखान्याची. या सहकारी कारखान्याला 80 कोटी रुपयांचे कर्जची थकहमी सरकार देणार होते. सरकार विरोधकाला कर्ज देत नाही. थोपटे असो की अशोक पवार यांचा घोडगंगा कारखाना असो. या दोन्ही कारखानाला कर्ज मिळण्यास मोठी अडचण झाली. साखर कारखान्यांची अडवणूक टाळण्यासाठी आणि काँग्रेसमधील अहवलेना टाळण्यासाठी संग्राम थोपटे यांना भाजपशिवाय पर्याय दिसत नव्हता. संग्राम थोपटे यांनी याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केलेली असावी. परंतु संग्राम थोपटे यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्यांचे खंडण केलेले नाही. संग्राम थोपटे हे कार्यकर्त्याचा मेळावा घेणार आहे आणि त्या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहेत.
संग्राम थोपटे यांना भाजपकडून काय मिळणार ?
संग्राम थोपटे यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत संधी देण्याची आश्वासन दिले असणार आहे. परंतु भाजपने अशी आश्वासने अनेक नेत्यांना दिलेली आहेत. संग्राम थोपटे यांच्या सहकारी कारखान्याला कर्ज मंजूर करून घेण्याची जास्त त्यांना आवश्यकता आहे. अजित पवार यांच्यासोबत ते जाणार नाहीत. कारण त्यांचा येथे आमदार आहेत. पाच ते सहा वर्षांची देवेंद्र फडणवीस यांची ऑफर ही थोपटे यांनी स्वीकारले असल्याचे बोलले जात आहे. संग्राम थोपटे यांना अशी अट घातलेली आहे. आगामी जिल्हा परिषद, भोर नगरपालिका निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावर लढावी लागणार आहे. त्यामुळे संग्राम थोपटे हे पंजाची साथ सोडून कमळ हाती घेणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत गेले आहेत. संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरली आहे. तिसरे आमदारही रांगेत आहे. त्यामुळे काँग्रेस पुण्यातून संपली असेच दिसत आहे. काँग्रेससाठी बिकट अवस्था आहे.
अजितदादांविरोधात फळी निर्माण करणार
भाजप पुणे जिल्ह्यात अजितदादांविरोधात तगडी फळी निर्माण करत आहे. काँग्रेसला फटका बसत आहेत. तसेच अजितदादांचा राष्ट्रवादी तोडीस तोड लढाई देण्याचे भाजपने ठरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येत आहे. थोपटे आणि काँग्रेसचे माजी मंत्री व सध्या राष्ट्रवादीत असलेल्या एका नेत्याची दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी अमित शाह यांची भेट घालवून दिले असल्याचे सांगितले जात आहे.