Download App

विजयानंतरही काँग्रेस तणावात! कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार पोस्टर वॉर

D. K. Poster war between Sivakumar and Siddaramaiah : ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकात भाजप (BJP) आता सत्तेबाहेर आहे. स्पष्ट बहुमत मिळवून आणि 10 वर्षांनंतर राज्यात स्वबळावर सत्तेत परतल्याने काँग्रेसने (Congress) सरकार स्थापनेचे लक्ष्य ठेवले आहे. 1989 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हा काँग्रेसचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. अशाप्रकारे राज्यात कोणताही सत्ताधारी पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर न येण्याची 38 वर्षे जुनी प्रथा पुन्हा एकदा कायम ठेवण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री (Chief Minister of Karnataka) कोण होणार, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांच्या मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल काल समोर आला. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या तर भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. जेडीएला 19 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. बेंगळुरू पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. काँग्रेसच्या या विजयामुळे दक्षिणेतील एकमेव राज्यही BJP च्या हातातून गेले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. जेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी सिद्धरामय्या यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर एक पोस्टर लावले. त्यावर सिद्धरामय्या यांचा उल्लेख “कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री” असा केला आहे. सिद्धरामय्या यांनी यापूर्वी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांनाही चांगला अनुभव असून ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दुसरीकडे, बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर एक पोस्टर लावले आणि त्यांना कर्नाटकचे “मुख्यमंत्री” घोषित करावे, अशी मागणी केली. त्यामुळं कर्नाटकातील विजयानंतरही काँग्रेसमधील तणाव संपलेला नाही.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज पहिली बैठक
कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाची पहिली बैठक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कर्नाटकात काँग्रेसला 42.88 टक्के मते मिळाली, तर 2018 मध्ये पक्षाला सुमारे 38 टक्के मते मिळाली. राज्यातील सहा प्रदेशांपैकी जुने म्हैसूर, मुंबई कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक आणि मध्य कर्नाटक प्रदेश काँग्रेसने जिंकले. त्याच वेळी, भाजप फक्त किनारपट्टीच्या कर्नाटकात आपली पकड राखू शकला, तर बंगळुरूमध्ये दोन्ही पक्षांची सारखीच कामगिरी होती.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या लालसेपोटी कर्नाटक कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली असून त्यामुळे काँग्रेस हायकमांडपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कर्नाटकातील या दोन्ही बाहुबली नेत्यांपैकी एका निवड करताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.

 

Tags

follow us