आंदोलनांमुळे सरकारला घाम फोडणाऱ्या ‘जंतर-मंतर’ची गोष्ट… जी तुम्हाला माहितीचं नाहीये…

History Of Jantar Mantar कोणतंही मोठं आंदोलन, उपोषण किंवा सरकारविरोधातील निदर्शनं म्हटलं की दिल्लीतील जंतर-मंतर हे नाव हमखास समोर येतं.

History Of Jantar Mantar

History Of Jantar Mantar

History Of Jantar Mantar In India : देशातील कोणतंही मोठं आंदोलन, उपोषण किंवा सरकारविरोधातील निदर्शनं म्हटलं की दिल्लीतील जंतर-मंतर हे नाव हमखास समोर येतं. गेल्या अनेक दशकांत या ठिकाणाने असंख्य राजकीय आणि सामाजिक आंदोलनांचं साक्षीदार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनेकांसाठी जंतर-मंतर म्हणजे केवळ आंदोलनांचं ठिकाण. मात्र, ही त्याची खरी ओळख नाही. सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू असल्याने या ऐतिहासिक वास्तूची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दिल्लीपुरतंच नव्हे तर देशात अशा एकूण पाच जंतर-मंतर उभारण्यात आल्या होत्या. त्या कोणी बांधल्या? त्यामागचा उद्देश काय होता? आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही या वेधशाळांचं महत्त्व का कायम आहे? जाणून घेऊया या अनोख्या वैज्ञानिक वारशाची कहाणी.

‘मित्रों’ नव्हे, तर ‘फ्रेंड्स’, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?

‘जंतर-मंतर’ म्हणजे नेमकं काय?

आज जिथे आंदोलनांचे आवाज घुमतात, त्याच ठिकाणी सुमारे 300 वर्षांपूर्वी सूर्य, चंद्र, ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींचा अभ्यास केला जात होता. सूर्याच्या सावलीवरून वेळ मोजली जात होती, ग्रहणांचा अंदाज वर्तवला जात होता आणि पंचांगासाठी अचूक खगोलीय गणितं मांडली जात होती. म्हणजेच, जंतर-मंतर हे एकेकाळी भारताच्या वैज्ञानिक परंपरेचं आणि खगोलशास्त्रीय संशोधनाचं महत्त्वाचं केंद्र होतं.

‘जंतर’ म्हणजे यंत्र आणि ‘मंतर’ म्हणजे गणना किंवा मोजमाप. म्हणजेच आकाशातील ग्रह, तारे, सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालींचं निरीक्षण करून अचूक गणना करणाऱ्या यंत्रांचं संकुल म्हणजे जंतर-मंतर. त्या काळातील ही अत्याधुनिक ‘ओपन एअर ऑब्झर्व्हेटरी’ (Open Air Observatory) होती.

जंतर-मंतर कोणी आणि का बांधले?

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, देशात फक्त दिल्लीतच जंतर-मंतर आहे का? आणि ते कुणी बांधले तर, फक्त दिल्लीतच जंतर-मंतर नसून, देशभरात एकूण पाच ठिकाणी जंतर-मंतर आहेत. 18 व्या शतकात आमेर आणि जयपूरचे शासक महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी या वेधशाळा उभारल्या. ते केवळ राजे नव्हते, तर गणित, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे अभ्यासकही होते.

त्याकाळी ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीची गणितं मांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तक्त्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे पंचांग, ग्रहणं, सण-उत्सव आणि शुभमुहूर्तांच्या तारखांमध्ये फरक पडत असे. ही समस्या दूर करण्यासाठी सवाई जयसिंह यांनी एक वेगळाच मार्ग स्वीकारला. धातूच्या छोट्या उपकरणांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी दगड, वीट आणि चुन्यापासून प्रचंड आकाराची कायमस्वरूपी खगोलीय यंत्रं उभारली. यातूनच जंतर-मंतरचा जन्म झाला.

Delhi Protest : इंटरनेट बंद, नेटवर्क गायब तरीही दिल्लीतील आंदोलनात मेसेजची देवाणघेवाण…

भारतातील 5 जंतर-मंतर कुठे आहेत?

1. दिल्ली – आज आंदोलनांचं केंद्र, पूर्वी विज्ञानाचं केंद्र

सन 1724 च्या सुमारास उभारलेलं दिल्लीचं जंतर-मंतर हे देशातील पहिलं जंतर-मंतर मानलं जातं. येथील सम्राट यंत्र, जयप्रकाश यंत्र, राम यंत्र आणि मिश्र यंत्र या उपकरणांच्या मदतीने स्थानिक वेळ, सूर्याची स्थिती, ग्रह-ताऱ्यांचं निरीक्षण आणि दिशा मोजली जात असे. आज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) या स्मारकाची देखभाल करतं. मात्र, काळानुसार दिल्लीतील जंतर-मंतरची आणखी एक ओळख निर्माण झाली—देशातील आंदोलनांचं प्रमुख ठिकाण.

2. जयपूर – जगातील सर्वात मोठ्या सूर्यघड्याळाचं घर

1728 ते 1734 दरम्यान बांधलेलं जयपूरचं जंतर-मंतर हे सर्वांत मोठं आणि सर्वाधिक सुस्थितीत असलेलं वेधशाळा संकुल आहे. येथील सम्राट यंत्र ही जगातील सर्वात मोठ्या दगडी सूर्यघड्याळांपैकी एक मानली जाते. वास्तुकला, गणित आणि खगोलशास्त्राचा अनोखा संगम असलेल्या या जंतर-मंतरला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

3. उज्जैन – भारताच्या कालगणनेचं हृदय

प्राचीन भारतात उज्जैनला कालगणनेचं प्रमुख केंद्र मानलं जात होतं. त्यामुळे येथेही सवाई जयसिंह यांनी वेधशाळा उभारली. येथील उपकरणांच्या मदतीने सूर्य, चंद्र आणि ग्रहांची स्थिती तसेच वेळेचं अचूक मोजमाप केलं जात असे.

4. वाराणसी – धर्म आणि विज्ञानाचा संगम

गंगा किनाऱ्यावरील मानमंदिर परिसरात 1730 च्या दशकात वाराणसीचं जंतर-मंतर उभारण्यात आलं. त्या काळी वाराणसी हे धर्म, शिक्षण आणि पंचांग निर्मितीचं प्रमुख केंद्र होतं. त्यामुळे येथे खगोलीय निरीक्षणांना विशेष महत्त्व होतं.

5. मथुरा – इतिहासात हरवलेलं जंतर-मंतर

मथुरामध्येही सवाई जयसिंह यांनी जंतर-मंतर उभारलं होतं. मात्र, कालांतराने ते पूर्णपणे नष्ट झालं. आज त्याचे मूळ अवशेषही शिल्लक नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक वारसा जतन करणं किती महत्त्वाचं आहे, याची ही जिवंत आठवण ठरते.

खाजवा डोकं! QR Code च्या फक्त 3 कोपऱ्यांतच मोठे बॉक्स मग, चौथा कोपरा रिकामा का?

जंतर-मंतरचं तेव्हाचं महत्त्व काय?

आज वेळ पाहण्यासाठी घड्याळ, मोबाईल, GPS आणि उपग्रह उपलब्ध आहेत. पण तीनशे वर्षांपूर्वी अशी कोणतीही साधनं नव्हती. तरीही भारतीय शास्त्रज्ञांनी केवळ गणित, भूमिती, सूर्याची सावली आणि वास्तुकलेच्या मदतीने इतकी अचूक यंत्रं तयार केली होती की त्यातून…वेळ निश्चित केली जात होती, ग्रह-ताऱ्यांच्या हालचाली मोजल्या जात होत्या, पंचांग तयार केलं जात होतं, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचाही अंदाज वर्तवला जात होता. म्हणूनच जंतर-मंतर ही केवळ दगडांची इमारत नाही, तर भारतीय विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्राच्या समृद्ध परंपरेची जिवंत साक्ष आहे.

मुलांनी Meta AI ला सांगितली आत्मXXची गोष्ट, तर आई-वडिलांना लगेच मिळणार Alert…

आज जंतर-मंतरचं महत्त्व काय?

आज या वेधशाळांचा प्रत्यक्ष वैज्ञानिक वापर होत नसला, तरी त्यांचं ऐतिहासिक आणि शैक्षणिक महत्त्व प्रचंड आहे. त्या आपल्याला आठवण करून देतात की, भारताची वैज्ञानिक परंपरा आधुनिक तंत्रज्ञानापासून सुरू झालेली नाही. संगणक, उपग्रह आणि दुर्बिणींच्या अनेक शतकांपूर्वी भारतात खगोलशास्त्र, गणित आणि वास्तुकलेच्या आधारे अत्यंत अचूक निरीक्षणं केली जात होती. म्हणूनच जंतर-मंतर ही केवळ दगडांची स्मारकं नाहीत, तर भारताच्या वैज्ञानिक विचारसरणीची आणि ज्ञानपरंपरेची जिवंत साक्ष आहेत.

Exit mobile version