Delhi Protest : इंटरनेट बंद, नेटवर्क गायब तरीही दिल्लीतील आंदोलनात मेसेजची देवाणघेवाण…
CJP Protest आंदोलनाच्या परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा आणि नेटवर्कवर निर्बंध असतानाही काही आंदोलनकर्ते एकमेकांशी सतत संपर्कात
Delhi Protest & Student Messaging : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनादरम्यान एक वेगळंच तंत्रज्ञान चर्चेत आलं आहे. आंदोलनाच्या परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा आणि नेटवर्कवर निर्बंध असतानाही काही आंदोलनकर्ते एकमेकांशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. पण, इंटरनेट बंद असताना आंदोलक विद्यार्था एकमेकांशी कसे संपर्कात राहिले? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्लूटूथवर चालणाऱ्या ‘Mesh Messaging’ अॅप्सचा वापर झाला असावा, असा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला असून, या शक्यतेची चौकशी केली जात आहे. मात्र, कोणत्या अॅपचा वापर झाला किंवा प्रत्यक्षात अशा अॅप्सचा वापर झाला की नाही, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, इंटरनेट बंद असताना नेटवर्क गायब झालेले असताना खरचं होता येतं का? इंटरनेटशिवाय चालणारी टेक्नोलॉजी नेमकी काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
काल जंतर-मंतरवर आज मोदींसोबत दिलखुलास भेट; पवारांच्या ’24 तासां’तील दोन फोटोंमध्ये काय दडलंय?
इंटरनेटशिवाय मेसेज कसा पोहोचतो?
सामान्यतः WhatsApp, Telegram किंवा Signal सारख्या अॅप्सना इंटरनेट किंवा Wi-Fi लागतो. पण Mesh Messaging अॅप्सची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते. ही अॅप्स ब्लूटूथ लो एनर्जी म्हणजेच BLE या तंत्रज्ञानावर काम करतात. म्हणजेच मेसेज मोबाईल टॉवर किंवा इंटरनेट सर्व्हरकडे न जाता, थेट एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर ब्लूटूथद्वारे पोहोचतो.
नेमकं कसं काम करतं हे नेटवर्क?
समजा, एका व्यक्तीने मेसेज पाठवला. तो मेसेज सर्वप्रथम जवळच्या दुसऱ्या मोबाईलवर पोहोचतो. त्यानंतर तो फोन तोच मेसेज पुढील फोनकडे पाठवतो. अशाच प्रकारे प्रत्येक फोन पुढच्या फोनपर्यंत संदेश पोहोचवत राहतो. म्हणजेच प्रत्येक स्मार्टफोन ‘रिले स्टेशन’ किंवा ‘कम्युनिकेशन ब्रिज’ म्हणून काम करतो. यालाच ब्लूटूथ मेश नेटवर्क म्हटलं जातं. एका ठिकाणी जितके जास्त लोक आणि तितके जास्त फोन, तितकं हे नेटवर्क अधिक मजबूत होतं आणि संदेश अधिक लांब अंतरापर्यंत पोहोचू शकतो.
सिमकार्ड, इंटरनेट… काहीच लागत नाही…
या तंत्रज्ञानातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अनेक मेश मेसेजिंग अॅप्समध्ये फोन नंबर, ई-मेल किंवा सिमकार्डचीही गरज नसते. म्हणूनच इंटरनेट पूर्णपणे बंद असलं, तरी स्थानिक पातळीवर संवाद सुरू ठेवणं शक्य होतं.
पोलिसांसाठी ट्रॅक करणं का अवघड?
नेहमीच्या मेसेजिंग अॅप्समध्ये सर्व संदेश इंटरनेटमार्गे सर्व्हरवरून जातात. त्यामुळे आवश्यक परवानगीनंतर तपास यंत्रणांना काही डिजिटल माहिती मिळू शकते. पण मेश नेटवर्कमध्ये डेटा थेट एका फोनवरून दुसऱ्या फोनवर जात असल्याने पारंपरिक स्वरूपाचा डिजिटल ट्रेल तयार होत नाही. यामुळे अशा संवादाचा मागोवा घेणं तुलनेने अधिक कठीण ठरतं. मात्र, याचा अर्थ हे संदेश पूर्णपणे शोधता येत नाहीत, असा नाही. मोबाईल जप्त करणे, डिव्हाइस फॉरेन्सिक्स, सीसीटीव्ही, फेशियल रिकग्निशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जाऊ शकतो.
जरी हे तंत्रज्ञान इंटरनेटशिवाय काम करत असलं, तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. जसे की, ब्लूटूथची रेंज मर्यादित असते. नेटवर्क मजबूत राहण्यासाठी मोठ्या संख्येने यूजर्स आवश्यक असतात. मेसेज पोहोचायला काहीसा वेळ लागू शकतो. त्याशिवाय सतत ब्लूटूथ सुरू असल्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो.
कोणती अॅप्स वापरली जातात?
जगभरात मेश नेटवर्कवर आधारित अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये Briar, Bridgefy, FireChat आणि Bitchat यांसारख्या अॅप्सची विशेष चर्चा होते. काही अॅप्स फक्त ब्लूटूथवर, तर काही ब्लूटूथ आणि Wi-Fi Direct च्या मदतीने स्थानिक नेटवर्क तयार करतात.
अनेक आंदोलनांमध्ये मेश मेसेजिंगचा वापर
मेश मेसेजिंग अॅप तंत्रज्ञान प्रथमच चर्चेत आलेले नाही. तर याचा वापर 2019 मध्ये हाँगकाँग, इराण आणि म्यानमारमधील आंदोलनांदरम्यान इंटरनेट सेवा बंद असताना स्थानिक पातळीवर संपर्क कायम ठेवण्यासाठी अशा Mesh Messaging अॅप्सचा वापर झाल्याचे विविध संशोधन आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांत नमूद करण्यात आले आहे.
मोठी बातमी : दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू, गुन्हा दाखल न करता नजरकैदेत ठेवणार
दिल्लीतील प्रकरणात नेमकी स्थिती काय?
सध्या दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमक्या कोणत्या अॅपचा वापर झाला किंवा प्रत्यक्षात असा वापर झाला की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्लूटूथ मेश नेटवर्क या तंत्रज्ञानाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
थोडक्यात काय तर, आजवर इंटरनेटशिवाय संवाद अशक्य वाटत होता. पण ब्लूटूथ मेश नेटवर्क या तंत्रज्ञानमुळे योग्य अॅप्स आणि जवळपास असलेली उपकरणं असतील, तर मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटशिवायही संपर्क साधणं शक्य आहे. त्यामुळेच हे तंत्रज्ञान केवळ आंदोलनांपुरतं मर्यादित नसून, आपत्ती व्यवस्थापन, दुर्गम भागातील संपर्क आणि बचाव मोहिमांमध्येही अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.