Nirav Modi : ईडीने फरार व्यापारी नीरव मोदीवर (Nirav Modi) मोठी कारवाई करत करोडो रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने (ED) ही कारवाई PNB बँक फसवणूक प्रकरणात केली आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईत नीरव मोदी यांची 29.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँक बॅलन्स जप्त करण्यात आले आहे.
सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. नीरव मोदी यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलमांतर्गत सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. नीरव मोदी यांच्यावर तब्बल 6498.20 कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करताना ईडीला नीरव मोदी आणि त्याच्या भारतातील कंपन्यांशी संबंधित 29.75 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटली आहे. यामध्ये जमीन, इमारती आणि बँक खात्यातील ठेवींचा समावेश असल्याची माहिती देखील ईडीने दिली आहे.
तसेच या प्रकरणात नीरव मोदी यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापूर्वी पीएमएलए तपासादरम्यान ईडीने यापूर्वी नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांची भारत आणि परदेशातील सुमारे 2596 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तर दुसरीकडे आर्थिक गुन्हेगार कायदा (FEOA), 2018 अंतर्गत मुंबईतील एका विशेष न्यायालयाने नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांची 692.90 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देखील दिले होते.
या प्रकरणात तपासकरून 1052.42 कोटी रुपयांची मालमत्ता पीएनबी आणि इतर समूह बँकांना परत करण्यात आली आहे. पीएनबीमधील 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील नीरव मोदी मुख्य आरोपी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते फरार होते. सध्या ब्रिटनमधील तुरुंगात ते आहे आणि सरकारकडून त्यांना भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
Palghar News : महाराष्ट्रात चाललंय काय? 10 वर्षीय मुलीचं अपहरण अन् सामुहिक अत्याचार
माहितीनुसार, नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी बँक अधिकाऱ्यांसह बनावट एलओयू (लेटर ऑफ अंडरटेकिंग) द्वारे बँकांची फसवणूक केली होती. 2018 मध्ये हे प्रकरण समोर आले होते आणि त्यानंतर ते फरार झाले होते. सीबीआय आणि ईडीकडून या घोटाळ्याची चौकशी सुरु असून आतापर्यंत सीबीआय आणि ईडीकडून नीरव मोदी यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आले आहे.