पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून इंधनाची (Ethanol) आयात कमी करण्यासोबतच प्रदूषण घटविण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या प्रयोगानंतर सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. E20 पेट्रोलवरून देशात चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले जाणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारने डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची चाचणी घेतली. मात्र, त्याचे निष्कर्ष समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रयोग तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे डिझेलचा फ्लॅश पॉइंट. इंधनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निकष आहे.
इथेनॉल मिसळल्यानंतर डिझेलचा फ्लॅश पॉइंट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्यामुळे इंधनाची साठवणूक, वाहतूक आणि हाताळणी करताना आग लागण्याचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना सध्या पुढे न नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली. सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या संशोधन आणि विकास केंद्रांमार्फत डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची चाचणी घेतली. या चाचणीसाठी प्रमाणित प्रयोगशाळा, वाहननिर्मिती कंपन्या तसेच इतर तांत्रिक संस्थांचीही मदत घेण्यात आली. डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यास त्याचा इंधनाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास या चाचण्यांद्वारे करण्यात आला.
चाचणीत काय आढळले?
चाचणीदरम्यान डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर त्याचा फ्लॅश पॉइंट लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचं आढळले. राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या माहितीनुसार, इथेनॉल मिश्रित डिझेल निर्धारित फ्लॅश पॉइंटच्या सुरक्षा निकषांची पूर्तता करू शकले नाह. यामुळं डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना सध्या पुढे न नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
फ्लॅश पॉइंट म्हणजे काय?
फ्लॅश पॉइंट हा कोणत्याही इंधनाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा निकष आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इंधनातून बाहेर पडणाऱ्या वाफा हवेत मिसळल्यानंतर बाहेरील आग किंवा ठिणगीच्या संपर्कात आल्यास क्षणभर पेट घेऊ शकतील, असे सर्वात कमी तापमान म्हणजे फ्लॅश पॉइंट.
फ्लॅश पॉइंट जितका कमी, तितक्या सहजतेने इंधनाला आग लागण्याची शक्यता वाढते. डिझेलची साठवणूक, टँकरद्वारे वाहतूक तसेच पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांमध्ये साठवणूक करताना हा सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळं चाचणीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यापासून सरकारने तूर्तास माघार घेतली आहे.
