तिर्थयात्रेला निघालेल्या कर्नाटकातील भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो-ट्रक भीषण धडकेत 8 जण ठार, 12 गंभीर जखमी

भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 12 जण जखमी झाले आहेत.

Untitled Design 96

Untitled Design 96

Fatal Bolero-truck accident in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 12 जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना कुर्नुल जिल्ह्यातील मंत्रालयम मंडळ अंतर्गत चिलकलडोना गाव परिसरात घडली. भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी तीर्थयात्रेला जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला.

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित 3 जणांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. या अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे कर्नाटक राज्यातील चिक्कमंगलूर जिल्ह्यातील यात्रेकरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व भाविक श्री राघवेंद्र मंदिर येथे दर्शनासाठी जात होते. श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या या प्रवासावर निघालेल्या भाविकांवर अचानक आलेल्या या काळाच्या झटक्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने एम्मिगनूर येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्थरीय वैद्यकीय केंद्रात हलवण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचा प्राथमिक अंदाज वेग, निष्काळजीपणा किंवा समोरून येणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटणे यामुळे लागला असावा. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून दोन्ही वाहनांचे अवशेष तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच संबंधित कुटुंबियांना माहिती देण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमींना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ही घटना पुन्हा एकदा देशातील रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न अधोरेखित करते. विशेषतः तीर्थयात्रा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान वाहनांची सुरक्षितता, चालकांचे प्रशिक्षण आणि वाहतुकीचे नियम यांचे काटेकोर पालन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून या मार्गावर वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version