अपघाती मृत्यू झाल्यास गृहिणींना प्रतिमहिना 30 हजार मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Supreme Court जेव्हा एखाद्या गृहिणीचा अपघातामुळे मृत्यू होतो, तेव्हा नुकसान भरपाई निश्चित करताना त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन करणे आवश्यक

  • Written By: Published:
Supreme Court

Pay 30K Per Month In Motor Accident Claims Of Homemaker Women : अपघातात एखाद्या गृहिणीचा मृत्यू झाल्यास आता दरमहा 30 हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अपघाताच्या दाव्यावरील अपिलावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गृहिणींचे योगदान केवळ घरापुरते मर्यादित नाही उलट, त्या राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसान भरपाई निश्चित करताना, गृहिणीच्या मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबाला मिळणाऱ्या घरगुती काळजीवाहू सेवेच्या नुकसानीची स्वतंत्रपणे दखल घेतली पाहिजे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

नेमकं कोर्टाने काय म्हटलंय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू होतो, तेव्हा नुकसान भरपाई त्यांच्या उत्पन्न किंवा पगाराच्या आधारावर ठरवली जाते. तथापि, गृहिणींच्या बाबतीत हे गुंतागुंतीचे होते, कारण त्यांचे उत्पन्न निश्चित नसते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता गृहिणींच्या नुकसान भरपाईसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जेव्हा एखाद्या गृहिणीचा अपघातामुळे मृत्यू होतो, तेव्हा नुकसान भरपाई निश्चित करताना त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. गृहिणींचे योगदान केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही, त्या मानवी संसाधन विकास आणि राष्ट्र उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे, त्यांना केवळ “गृहिणी” म्हणण्याऐवजी “राष्ट्र निर्मात्या” म्हटले पाहिजे असेही कोर्टाने यावेळी नमुद केले.

दरमहा 30 हजार रुपये नुकसान भरपाई निश्चित करावी

न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, गृहिणींनी केलेल्या घरगुती कामांना आणि काळजीवाहू सेवांना असे आर्थिक मूल्य आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गृहिणींच्या मृत्यूबद्दल मिळणारी नुकसान भरपाई दरमहा 30 हजारपर्यंत मर्यादित असावी.

 

गृहिणींनी केलेल्या घरगुती कामांना आणि काळजीवाहू सेवांना असे आर्थिक मूल्य आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जेव्हा अपघातामुळे कुटुंब गृहिणीच्या घरगुती काळजी आणि सेवांपासून वंचित राहते, तेव्हा तिच्यासाठी नुकसान भरपाई ठरवताना या योगदानाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. यासाठी, न्यायालयाने घरगुती देखभालीच्या नुकसानीचे मूल्य प्रति महिना 30 हजार निश्चित केले. खंडपीठाने असेही नमूद केले की, हे तत्त्व पूर्वीच्या निकालात निश्चित केलेल्या मानकांव्यतिरिक्त आहे आणि नुकसान भरपाई ठरवण्यासाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व प्रदान करते. सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे वेळेवर निकाली काढता येतील.

follow us