Godhra Case : देशभर गाजलेले गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या या हत्याकांडातील 8 दोषींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडातील दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने 4 दोषींना जामीन नाकारला आहे. या चौघांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले.
सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्या.पी.एस.नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. जामिनाच्या अटी पुर्ण करीत दोषींची जामिनावर मुक्तता करण्यात यावी, असे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. दरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर जामिनावर मुक्तता करण्यात यावी अशी मागणी दोषींचे वकील संजय हेगडे यांनी केली होती.
न्यायालय काय म्हणाले?
दोषींच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरु असताना मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायालयाने सांगितले की, फाशीची शिक्षा झालेले चार दोषी यांना वगळता बाकीच्यांना जामीन दिला जाऊ शकतो. दरम्यान सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेले आठ दोषी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
…तर संजय राऊत अजितदादांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, भाजप खासदारांचा गौप्यस्फोट
फाशीची शिक्षा जन्मठेपेत
2002 मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणी 2011 मध्ये एसआयटी कोर्टाने 11 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर 20 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर उच्च न्यायालयाने दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.