मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक (Iran) आर्थिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी आली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी प्री-ओपनिंग सत्रातच शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
प्री-ओपनिंग सत्रात BSE सेन्शक्स तब्बल 2,700 हून अधिक अंकांनी कोसळला. काही वेळासाठी बाजारात मोठी घबराट पसरली होती. सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. तसेच NIFTY 50 निर्देशांकही प्री-ओपनिंगमध्ये 500 हून अधिक अंकांनी खाली आला. नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतरही घसरगुंडी कायम राहिली. एका टप्प्यावर सेन्सेक्स 1,000 अंकांनी घसरला, तर निफ्टी 324 अंकांनी खाली व्यवहार करत होता.
मोसादचा मास्टरस्ट्रोक! अयातुल्लांचा अंत; कसं आखलं ऑपरेशन रोअरिंग लायन? वाचा, खास स्टोरी
इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. आशियाई व्यवहारात Brent Crude तब्बल 13 टक्क्यांपर्यंत वाढला. नंतर किंमत काहीशी स्थिर झाली असली तरी टोकियो वेळेनुसार दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बेंचमार्क सुमारे 5 टक्क्यांनी वाढून 76.48 डॉलर प्रति बॅरलवर होता. तेलदरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती असून भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो.
आशियाई बाजार देखील घसरणीसह खुले झाले. हाँगकाँगचा Hang Seng Index सुमारे 2 टक्क्यांनी खाली आला, तर जपानचा Nikkei 225 निर्देशांक सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरला. अमेरिकेतही नियमित व्यवहारांपूर्वीचे स्टॉक फ्युचर्स घसरले. S&P 500 आणि NASDAQ Composite यांना ट्रॅक करणारे फ्युचर्स सुमारे 0.7 टक्क्यांनी खाली होते. यामुळे वॉल स्ट्रीटवरही अस्थिर व्यवहार होण्याचे संकेत मिळाले आहेत.
जागतिक तणाव, तेलदरवाढ आणि संभाव्य महागाईचा दबाव या तिहेरी परिणामामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. संघर्ष अधिक तीव्र झाल्यास बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस जागतिक घडामोडींवरच बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
