Download App

Haridwar : ‘कॅन्सर’ग्रस्त मुलाला बुडवून मारल्याचा आरोप; पण पोलिसांनी सांगितले वेगळेच सत्य

Haridwar News : हरिद्वार येथील हर की पौडी येथे घटलेल्या एका (Haridwar) घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तिच्या मुलाला नदीच्या पाण्यात बुडवताना दिसत आहे. या महिलेबरोबर (Uttarakhand) दोन पुरुषही आहेत. काही वेळानंतर घाटावर उपस्थित असणारे लोक त्या मुलाला जबरदस्तीने बाहेर काढतात मात्र तो मुलगा काहीच हालचाल करत नाही. यानंतर लोकांनी महिला आणि पुरषांना मारहाण केल्याचे दिसते. दुसऱ्या एका व्हिडिओत महिला मुलाच्या मृतदेहाबरोबर बसलेली दिसत आहे. हसत हसत मुलगा आता उठेल असे म्हणत आहे. यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली. आता यानंतर कुणालाही वाटेल की त्या महिलेनेच मुलाला नदीत बुडवून मारले पण खरे कारण मात्र वेगळेच आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. महिलेने मुलाला मारले हा जो आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे. या प्रकरणाचे आस्था आणि अखेरचा प्रयत्न म्हणून वर्णन करता येऊ शकते. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येत आहे तसेच मुलाचा पोस्टमार्टेम अहवाल अद्याप आलेला नाही.

भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला ब्लड कॅन्सर होता. कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयाने मुलाला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. यानंतर शेवटचा उपाय म्हणून मुलाचे आई वडिल त्याला हरिद्वारला घेऊन आले होते. यानंतर संध्याकाळी पाच वाजता मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मुलाच्या फुफ्फुसात पाणी नव्हते आणि पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. असे असले तरी अहवाल आल्यानंतरच जास्त माहिती देता येईल असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की मुलाच्या आई वडिलांकडे आम्ही चौकशी केली होती. परंतु मुलाचा मृत्यू नदीत बुडवून झाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले. दिल्लीतील रहिवासी टॅक्सीचालक रणजित कुमार या लोकांना घेऊन हरिद्वारला आले होते. मुलगा खूप आजारी होता. गाडीत बसल्यानंतर थोड्याच वेळात मुलाने हालचाल करणे बंद केल्याचे रणजित कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा आना, आमदार प्रसाद लाड आक्रमक

follow us