Uttarakhand Tunnel Rescue : ‘सुरुवातीचे 24 तास आमच्यासाठी’.. कामगाराने सांगितलं 17 दिवसात काय घडलं?
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांना तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नैसर्गिक संकटांचा कोणताही विचार न करता या 41 जीवांना बाहेर काढण्यासाठी हजारो हात झटले. अभियंता असो की सामान्य माणूस, सरकारी यंत्रणा प्रत्येकाचेच यात योगदान राहिले. 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या सतरा दिवसात काय वाटलं, अनुभव कसा होता याची माहिती आता कामगार देत आहेत. यातीलच एक कामगार सुबोध कुमार वर्माने बोगद्याच्या आत 17 दिवस कसे गेले त्याचा अनुभव सांगितला.
सुबोधकुमार वर्मा झारखंडचा रहिवासी. उत्तरकाशीच्या (Uttarkashi) बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलो होतो. सुरुवातीचे 24 तास आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत जिकिरीचे होते. काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. हा प्रसंग आमच्यासाठी नवाच होता. आम्हाला काही खायलाही मिळालं नाही. त्यानंतर मात्र कंपनीने पाईपद्वारे काजू,बदाम, किसमिस, पुडिंग असे खाद्यपदार्थ पाठवले. त्यानंतर पुढे दहा दिवसांनी जेवण पाठवले जाऊ लागले.
#WATCH | Subodh Kumar Verma, a worker rescued from the Silkyara tunnel, thanks the Central and State governments for their efforts to bring out all 41 men safely
"The first 24 hours were tough but after that food was provided to us through a pipe. I am absolutely fine and in… pic.twitter.com/ocfBxF2HZl
— ANI (@ANI) November 29, 2023
या सतरा दिवसांच्या काळात आमच्या कंपनीने आमची काळजी घेतली. सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी कंपनीबाबत तक्रार नाही. सुरुवातीचे 24 तास मात्र अत्यंत त्रासदायक होते. मात्र सगळ्यांच्या प्रार्थना आमच्या पाठिशी होत्या. त्याचा परिणाम म्हणून मी आणि माझे सहकारी बाहेर येऊ शकलो.
17 दिवसांनंतर कामगारांना सुखरूप बाहेर काढले
उत्तराकाशी जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिलक्यारा बोगद्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या चार धाम ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. 12 नोव्हेंबर रोजी या बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे येथे काम करणारे मजूर आतमध्येच अडकून पडले. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू होते. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांच्यासह देशातील आणि परदेशातील विविध तज्ञ्ज या कामात गुंतले होते. ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव कार्यासाठी तळ ठोकून होते.
संपूर्ण खोदकाम पूर्ण झाल्यानंतर याच पाईपच्या मदतीने एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा प्रत्येकी एक जवान बोगद्यात मजूर अडकलेल्या भागात गेला आणि तिथून एनडीआरएफच्या टीमने कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. आता या मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यावेळी दुर्घटनास्थळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह हे उपस्थित होते.