Operation Sindoor : काल रात्री पाकिस्तानने भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल्सच्या (Operation Sindoor) मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. काल झालेल्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीय नागरिकांचा (India Pakistan War) मृत्यू झाला. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद आजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. मागील 65 वर्षांत भारतानं सिंधू पाणीवाटप करणं ही भारताची सहिष्णूता आहे. आता यापुढे मात्र भारत आपल्या हक्काचं पाणी वापरणार असा इशारा भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
भारताने केलेल्या कारवाईची माहिती देताना पररिष्ट्र सचिव विवेक मिस्त्री म्हणाले, दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी भारताने दिलेल्या पुराव्यांचा वापर पाकिस्तानने केला. भारताला आणखी तणाव वाढवायचा नाही. दहशतवादी कारवायांतून हात झटकण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. जागतिक दहशतवादाचं केंद्र म्हणून पाकिस्तानविरोधात अनेक पुरावे आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानकडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच मान्य केले आहे. पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेसाठी पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित राहतात याचा अर्थ काय? असा सवाल विवेक मिस्त्री यांनी केला.
पाकिस्तानच्या कुरापतींना आज उत्तर देण्यात आलं आहे. जर आता पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा विवेक मिस्त्री यांनी दिला. आज जगात पाकिस्तानची ओळख नेमकी काय आहे हे सांगण्याची मला गरज नाही. ओसामा बिन लादेन कुठे आढळून आला आणि त्याला कुणी शहीद म्हटलं होतं असाही सवाल मिस्त्री यांनी केला.
पाकिस्तान आता दहशतवादापासून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत पाकिस्तानचा सहभाग राहिला आहे. पाकिस्तानच्याच संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानचे संबंध मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी करुन पाकिस्तानने फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पठानकोट, मुंबई हल्ल्यात भारताने पाकिस्तानला पुरावे दिले होते तरी देखील त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही असे मिस्त्री यांनी सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांनी सांगितले की आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान स्थित अनेक ठिकाणांवर हल्ले केले. लाहोरमध्ये एक एअर डिफेन्स सिस्टिमही (Air Defence System) उद्धवस्त करण्यात आली आहे.