IPS Mahesh Bhagwat : अमेरिकाही ज्यांना मानतं, ते मराठी सुपुत्र आता तेलंगणाचे नवे DGP

IPS Mahesh Bhagwat मराठी पाऊल पडते पुढे" हे केवळ वाक्य नसून ते सत्यात उतरवून दाखवलंय, नगरच्या मातीतील सुपुत्र महेश मुरलीधर भागवत यांनी!

IPS Mahesh Bhagwat : अमेरिकाही ज्यांना मानतं, ते मराठी सुपुत्र आता तेलंगणाचे नवे DGP!

IPS Mahesh Bhagwat : अमेरिकाही ज्यांना मानतं, ते मराठी सुपुत्र आता तेलंगणाचे नवे DGP!

IPS Mahesh Bhagwat Promoted To DGP Telangana : जिद्द, चिकाटी आणि समाजसेवेची ओढ असेल तर, खेड्यापाड्यातील मुलगाही देशाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो, हे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश मुरलीधर भागवत (IPS) यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP – कायदा व सुव्यवस्था) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नेमका भागवत यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला त्याबद्दल जाणून घेऊया…

जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी ते IPS

महेश भागवत यांचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीतील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुण्यातील ‘सीओईपी’ मधून (COEP) इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1995 मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. तेलंगणा केडरमध्ये सेवा देताना त्यांनी आपल्या कामाचा असा ठसा उमटवला की, आज केवळ भारतच नाही तर, अमेरिका आणि कॅनडासारखे देशही त्यांच्या कार्याचा गौरव करतात.

मानवी तस्करीविरुद्धचा ‘ग्लोबल हिरो’

महेश भागवत यांचे नाव आज जगभरात ‘मानवी तस्करी’ विरुद्ध लढणारे योद्धे म्हणून ओळखले जाते. त्यांनी केलेल्या कामाचा आवाका थक्क करणारा आहे. वेश्याव्यवसाय आणि तस्करीच्या जाळ्यातून त्यांनी 2000 महिलांची सुटका केली आणि 200 हून अधिक कुंटणखाने बंद केले. एवढेच नव्हे तर, ते बालमजुरांसाठी देवदूत ठरले. भागवत यांनी 7 हजारांपेक्षा जास्त बालमजुरांची सुटका करून त्यांच्यासाठी ‘वर्कसाईट स्कूल’ सुरू केले.

देशाच्या गृहमंत्रालयाने प्रकशित केलेल्या मानवी तस्करीवरील आठ पुस्तकांमध्ये भागवत यांचे योगदान आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘सिनर्जी बिटविन स्टेकहोल्डर्स’ हे पुस्तक दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. एवढेच काय तर, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथील संयुक्त राष्ट्र मानवी तस्करी विरोधी परिषद, अमेरिका येथील भारताने दहशतवाद रोखणे या विषयावरील व ह्यूमन ट्रॅफिकिंग आणि कम्युनिटी पोलिसिंग या परिसंवादात त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

भागवत यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्यामध्ये अमेरिकेच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोलिसचा पोलिसिंग पुरस्कार, होमलँड सिक्युरिटी विशेष सन्मान, आसरा प्रकल्पाला अमेरिकेचा वेबर सॅव्ही लॉ एन्फोर्समेंट पुरस्कार, नागरी हक्क पुरस्कार त्याशिवाय कॅनडा येथील मानवी तस्करी विरोधी कार्य करणाऱ्या जगातील शंभर नेत्यांच्या यादीत भागवत यांचे नाव आहे. भागवत यांनी सुरू केलेल्या वर्क साईट स्कूल प्रकल्पासाठी यूएसएच्या आयएसीपीकडून मानवाधिकार पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले असून, स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार, अमेरिका स्टेट डिपार्टमेंटचा ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हीरो पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी आयपीएस अधिकारी आहेत.

2004 मध्ये भाघवत यांना राष्ट्रपती शौर्य पदक, 2011 मध्ये राष्ट्रपती पोलीस गुणवत्तापूर्ण सेवा पदक, 2022 मध्ये राष्ट्रपती पोलीस विशेष सेवा पदक, मणिपूर पोलीस विशेष कर्तव्य पदक आणि आंध्रप्रदेश पोलीस अंतर्गत सुरक्षा पदक तसेच केंद्रीय गृहमंत्री प्रशंसापत्रक देऊनही त्यांना गौरविण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस महासंचालक पदापर्यंत पोहोचणारे ते दुसरेच अधिकारी आहेत. उच्च पदाचा कोणताही गर्व न बाळगता आजही ते आपल्या पाथर्डीतील मित्रपरिवाराशी आणि मातीशी जोडलेले आहेत. नक्षलवाद विरोधी मोहीम असो वा व्हाईट कॉलर गुन्हेगारी, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे.

भागवत केवळ गुन्हेगारांना पकडणे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, ते प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या मराठी मुलांसाठी आजही ‘मेंटर’ म्हणून काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 2300 पेक्षा जास्त अधिकारी देशसेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना अलीकडेच ‘मानद डॉक्टरेट’ बहाल करण्यात आली आहे.

भागवत यांच्या रूपाने एका जिद्दी मराठी माणसाने तेलंगणाच्या मातीत आपल्या कर्तृत्वाचा जो दरवळ निर्माण केला आहे, त्याला आज खऱ्या अर्थाने सलाम करण्याची वेळ आहे. पाथर्डीच्या या ढाण्या वाघाला पुढील प्रवासासाठी लेट्अप मराठी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

Exit mobile version